जिहादी दहशतवाद शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 27 October 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षेतील तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ निर्माण झालेला असताना आता "जिदाही दहशतवाद' या शब्दावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गोत्यात आले आहे.

पुणे ः अंतिम वर्षाच्या परीक्षेतील तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ निर्माण झालेला असताना आता "जिदाही दहशतवाद' या शब्दावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गोत्यात आले आहे. विद्यापीठाने यावर तातडीने खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे विद्यापीठातर्फे 12 ऑक्‍टोबरपासून अंतिम वर्षाची परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये लॉगइन न होणे, प्रश्‍न किंवा उत्तरांचे पर्याय न दिसणे, पर्यायाची निवड न होणे, चुकीचे भाषांतर होणे, सोडवलेला पेपर समबीट न होणे अशा अनेक तांत्रिक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले आहे. विद्यापीठ परीक्षेचा हा गोंधळ समोर आल्यानंतर त्यात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून खटाटोप सुरू आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून परीक्षा सुरळीत सुरू आहे. पण प्रश्‍नांची व पर्यायांची तज्ज्ञ समितीकडून व्यवस्थित छाननी न झाल्याने अनेक समस्या अद्यापही येत आहेत. त्यातत मंगळवारी समोर आलेल्या प्रकारामुळे विद्यापीठाचे धाव दणाणले आहेत.

पुणे विद्यापीठातर्फे "डिफेन्स बजेटींग' या विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यात धार्मिक, क्रांतिकारी, राजकीय आणि राज्य पुरस्कृत असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा प्रश्‍न सोशल मिडीयावरून व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या कामावर टीकेची झोड उठली.

यामुळे विद्यापीठाने याबाबत तातडीने खुलासा केला आहे. विद्यापीठ 3 हजार 300 विषयांची परीक्षा घेत आहे, पण एका विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत अनवधानाने चुकीच्या शब्दाचा उल्लेख झाला आहे. त्याबाबत विद्यापीठ प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित विषयाच्या संदर्भात प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच संबंधितांना समज देण्यात आली आहे, असे त्यात नमूद केले आहे.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

विषय कोणत्या अभ्यासक्रमाचा ?
एकीकडे विद्यापीठाने संबंधित विषयाच्या समितीच्या अध्यक्षांकडून खुलासा मागविल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी, "डिफेन्स बजेटींग' हा विषय कोणत्या अभ्यासक्रमाचा आहे हे विद्यापीठातील अधिकार सांगू शकले नाहीत. सर्व विषयांच्या प्रश्‍नसंचामधून हा शब्द शोधून काढण्यासाठी खास माणसे बसविण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

भाषांतर सुमार दर्जाचे- अंतिम वर्ष परीक्षेत प्रश्‍न मराठी व इंग्रजीतून विचारण्यात आले. त्यामध्ये ज्या शिक्षकांनी इंग्रजीतून प्रश्‍नसंच दिला, त्याचे अतिशय सुमार दर्जाचे गुगल भाषांतर करण्यात आले होते, अनेक प्रश्‍नांचा अर्थाचा अनर्थ झाला आहे. तरीही विद्यापीठ प्रशासनाने त्यास "किरकोळ' प्रकार आहे असे सांगत दुर्लक्ष केले होते. मात्र, आता जिदाही दहशतवाद या शब्दामुळे सारवासारव करण्याची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University is in trouble due to the word 'Jidahi Terrorism'