पंधरा वर्षांत विषमता नष्ट होईल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतातील गरिबी पंधरा वर्षांत नष्ट होऊन विषमतादेखील संपेल. त्याला कोणीही रोखू शकणार नाही; परंतु आपण जाती-धर्माचे भेद मनातून काढून टाकले पाहिजेत, असे मत उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले. 

पुणे - शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतातील गरिबी पंधरा वर्षांत नष्ट होऊन विषमतादेखील संपेल. त्याला कोणीही रोखू शकणार नाही; परंतु आपण जाती-धर्माचे भेद मनातून काढून टाकले पाहिजेत, असे मत उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजसेवक डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ, शिक्षण संस्थाचालक डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. विश्‍वनाथ कराड, मनोहरराव देशमुख (राजूर, जि. नगर), नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, राजा ढाले यांना फिरोदिया यांच्या हस्ते "जीवनसाधना गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू या वेळी उपस्थित होते. 

फिरोदिया म्हणाले, ""जनुकीय सुधारित वाणांमुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढल्याने ते स्वस्त होईल. कपडेदेखील स्वस्त होतील. तंत्रज्ञानामुळे मोबाईल दूरध्वनीच्या विश्‍वात प्रचंड बदल झाले आहेत. त्याबरोबर देशात ई लर्निंगदेखील सुरू झाले आहे. आता अमेरिकेतील अभ्यासक्रम देशात पूर्ण करता येतील. वाहतुकीसाठी "इलेक्‍ट्रिक ट्रान्सपोर्ट'चा स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. घरांच्या किमतीदेखील कमी होतील.'' 

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होतेच की, एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करील. ती परिस्थिती येऊ लागली आहे. त्यासाठी आपण आपापसांतील वाद सोडून दिले पाहिजेत, असे आवाहन फिरोदिया यांनी केले. ते म्हणाले, ""अमेरिकेचा "एच1बी' व्हिसा मिळत नाही म्हणून काही लोक खट्टू होत आहेत; परंतु लोकांची चाकरी करण्यापेक्षा आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी केला पाहिजे. त्यासाठी परदेशातील ज्ञानी भारतीयांना परत बोलावून आपले फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट प्रणाली विकसित करूयात.'' 

डॉ. आढाव यांनी विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे शिल्प उभारण्याची सूचना केली. ""या विद्यापीठाला केवळ सावित्रीबाईंचे नाव नको, तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र (सेंटर फॉर इन्फॉर्मल लेबर) सुरू करावे,'' असे ते म्हणाले. विद्या बाळ म्हणाल्या, ""स्त्री हे माणसाचे रूप आहे, याची जाणीव विद्यापीठाने प्रत्येक विद्याशाखांद्वारे करून दिली पाहिजे. शिक्षणाचा आणि माणूसपणाचा संबंध संपलाय. शिकलेला माणूस माणुसकी हरवून बसला आहे. विद्यापीठाने माणूसपणाचे शिक्षण द्यावे.'' 

डॉ. कराड म्हणाले, ""खरे ज्ञान समजून घ्यायचे असेल, तर प्रथम विज्ञान समजून घ्या, असा संदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. त्याचीच आज गरज आहे. महाविद्यालये, विद्यापीठे ही केवळ "डाटा कलेक्‍शन सेंटर' व्हायला नकोत, तर ज्ञान आणि संशोधनाचा प्रवाह तेथून वाहायला हवा.'' सुचेता भिडे-चापेकर यांनी विद्यापीठाने साधनेचा सन्मान केल्याची भावना व्यक्त केली. 

अध्यात्मामुळे गुलामी 
डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी त्यांच्या भाषणात अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत वेद-उपनिषिदे आणि ज्ञानेश्‍वरी यांचे महत्त्व सांगितले. त्यावर ढाले यांनी आक्षेप नोंदवत टीका केली. ते म्हणाले, ""अध्यात्माच्या भाषेमुळे देश गुलाम बनला आहे. त्यातून सुटका करायची असेल, तर मानवाची आणि विज्ञानाची भाषा बोलावी लागेल. देश भगवा करणे म्हणजे अध्यात्मात बुडवून टाकणे आहे, ही प्रगती नाही. तळातला माणूस शहाणा होईल, तेव्हाच प्रगती होईल. अध्यात्माच्या नावाखाली काहीही बोलू नये. थोडेच बोलावे; पण शहाणपणाने बोलावे.'' 

Web Title: Savitribai Phule Pune University's Anniversary Day