सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा युवक महोत्सव संपन्न

pune
pune

पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनीही युवक महोत्सवाबाबत आपली भूमिका मांडली. नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातून सहभागी झालेले एक हजाराहून अधिक विद्यार्थी कलाकारांनी या दोन दिवसीय युवक महोत्सवात भाग घेतला.

उमराणी म्हणाले, "आजचे युग हे कलेचे युग आहे. इतिहासात भारतात विविध संस्कृती निर्माण झाल्या आहेत त्यांचे संवर्धन कलेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे संस्कृती टिकण्यास मदत होते. तसेच या कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचे विद्यार्थ्यानी सोने करावे. युवक महोत्सव हा विद्यापीठाचा ब्रँड झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक भवितव्य त्यातून घडले पाहिजे."

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, "पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे त्याला साजेसा युवामहोत्सव झाल्यास युवकांचा उत्साह वाढविण्यास मदत होईल. आजवर अनेक कलावंत या पुण्यातून तयार झाले आहेत. आपलेही नाव त्या यादीत असावे यासाठी आपण कष्ट करावे व पुणे विद्यापीठाचा ठसा कलेच्या क्षेत्रात उमटविण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे."

दोन दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या युवा महोत्सवात एकूण 25 कलाप्रकार सादर होणार आहेत. यासाठी सहभागी झालेले विद्यार्थी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवक महोत्सवाच्या निमित्ताने कात टाकत असून पुढच्या वर्षीचा युवा महोत्सव याहीपेक्षा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आयोजन करू, असे मत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी युवक महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यापीठ युवक महोत्सव मागच्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या टप्प्यात सुरू असून महाविद्यालय, विभागीय व विद्यापीठ अशा अंतिम टप्प्यात हा महोत्सव आहे. गायन, वादन, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा वेगवेगळ्या विभागात एक हजारहून अधिक मुले सहभागी झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com