सर्व मंत्र्यांकडे बासरी हवी - पंडित चौरासिया

सवाई गंधर्व स्मारक - सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’ या कार्यक्रमात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया (डावीकडे) यांची मुलाखत घेताना अमरेन्द्र धनेश्‍वर.
सवाई गंधर्व स्मारक - सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत ‘अंतरंग’ या कार्यक्रमात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया (डावीकडे) यांची मुलाखत घेताना अमरेन्द्र धनेश्‍वर.

पुणे - ‘प्रत्येक घरातील, प्रत्येक बालकाच्या हाती बासरी पोचावी, ही तीव्र इच्छा आहे. हे सुमधुर वाद्य स्वरमेळाच्या माध्यमातून मनोमिलन घडवते. अशा वातावरणात भांडणे, वैर वगैरेला थारा नसतो. यासाठी खरे तर सर्व मंत्र्यांकडे बासरी पोचावी,’ अशी कोपरखळी बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी मारली.

आजपासून सुरू होणाऱ्या सदुसष्टाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध गायक व संगीत अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर यांनी त्यांना बोलते केले.

गणेशखिंड रस्त्यावरील राहुल चित्रपटगृहाजवळच्या सवाई गंधर्व स्मारक या वास्तूत झालेल्या या मुलाखतीत चौरासिया यांनी आपल्या कारकिर्दीचा पट उलगडला. ते म्हणाले, ‘पैलवान असलेल्या माझ्या वडिलांना मीही पैलवानकी करावी, असे वाटत होते. यापासून पळ काढावा, या हेतूने मी धडपडत असताना कटक आकाशवाणी केंद्रावर बासरीवादक म्हणून नेमणूक झाली. सुटलो असे वाटले; पण तेथे वेगळीच पैलवानकी करायची वेळ आली. अनेक ओडिसी नृत्यांगना, मी त्यांच्या कार्यक्रमात वादनसाथ करावी, यासाठी कार्यालयात मला बोलावणे करायला येत. ते न बघणाऱ्यांनी कटकारस्थान करून माझे आकाशवाणीतले काम हिरावले.’

मुंबईत चित्रपटसृष्टीत आधी संघर्ष, नंतर बसवलेला जम, असंख्य चित्रपटगीतांमध्ये केलेली बासरीची साथ, संगीत दिग्दर्शन, लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या गाण्यांमधील सहभाग, लताबाईंबरोबर मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या संगीत अल्बमसाठी मुबलक काम केल्यामुळे हरिप्रसाद मंगेशकर अशीही ओळख निर्माण होणे, जगभरातील शिष्य, गुरुकुल पद्धतीने शिक्षण देताना विद्यार्थ्यांशी जुळलेले स्नेहबंध हे सारे वर्णन हरिप्रसादजींच्या तोंडून ऐकताना त्यांच्या कलासाधनेची झलक मिळाली. ते म्हणाले की, ‘बासरी हे मुळात लोकवाद्य. आरंभी तिच्यावर लोकधून वाजवल्या जात. नंतर शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, चित्रपट संगीत अशी व्याप्ती बासरीवादनातून घडली. श्रोते कोणत्या प्रकारचे आहेत, ते हेरून त्यांना आवडेल असे वादन करायची दक्षता कलावंतांनी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com