गुरूंच्या आशीर्वादाने श्रोत्यांची सेवा

Atul-Khandekar
Atul-Khandekar

भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराणे व बालगंधर्वांच्या गायकीचा वारसा जपणारे युवा कलावंत, ही अतुल खांडेकर या आश्वासक गायकाची ओळख. या वर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथमच कला सादर करणाऱ्या या कलावंताचं मनोगत...

माझी आजी माणिक भट आणि आई मानसी यांच्यानंतर माझी तिसरी पिढी ग्वाल्हेर घराण्याशी जोडली आहे. माझ्या गुरू वीणाताई सहस्रबुद्धे १९८४ मध्ये कानपूरहून पुण्यात वास्तव्यासाठी आल्या. त्यांचं गाणं अत्यंत तयारीचं असूनही तोपर्यंत त्यांची माहिती फारशी कुणाला नव्हती. भीमसेनजींनी त्यांचं गाणं आकाशवाणीवरून ऐकलं आणि त्यांना ‘सवाई’त गायला सांगितलं. तो प्रसंग ताईंच्या कारकिर्दीचा शुभारंभ ठरला. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. या संधीसाठी ताईंच्या मनात भीमसेनजी व सवाईबद्दल अतीव आदर होता. ताईंचा शिष्य म्हणून सवाईत पहिल्यांदा सेवा देण्याची संधी मिळाल्यानं मी भारावून गेलो आहे. आज ताई हव्या होत्या. त्यांचे आशीर्वाद माझ्याकडून चांगली सेवा घडवतील.

बालगंधर्वांच्या गायकीचे संस्कार माझ्या आजीवर पं. हरिभाऊ देशपांडे यांनी केले. तिच्याकडून आईमार्फत माझ्याकडं आलेला हा वारसा जयमालाबाई शिलेदार या गुरूंमुळे दृढ झाला. त्यांना बालगंधर्वांचे आशीर्वाद लाभले होते. त्यांच्याकडून मला भरभरून शिकायला मिळालं.

सवाई हे संगीत क्षेत्रातील तीर्थक्षेत्र आहे. नकळत्या वयापासून मी इथं श्रोता म्हणून 
हजेरी लावत आलो. अशा ठिकाणी कला सादर करणं, हे कुठल्याही कलावंतांच स्वप्न असतं. या स्वरपंढरीत सेवा देताना माझ्या गुरू वीणाताई आणि जयमालाबाई, या दोघींना वंदन करून, त्यांच्याकडून मला मिळालेल्या विद्येची भावानुभूती मला श्रोत्यांना देता यावी, या भावनेनं सेवा देणार आहे. 
(शब्दांकन : नीला शर्मा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com