श्रोत्यांऐवजी आत्मानंदासाठी वादन हवे - पंडित बसंत काब्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘श्रोत्यांना खूश करणारे वादन करण्याऐवजी विशुद्ध संगीताची अभिव्यक्ती करायला हवी. कालांतराने समज वाढून रसिकांना ते आवडू लागेल,’’ असे परखड मत मैहर घराण्यातील प्रसिद्ध सरोदवादक पंडिता अन्नपूर्णादेवी यांचे शिष्य पंडित बसंत काब्रा यांनी हे व्यक्त केले. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बुधवारी ‘षड्‌ज’ या सप्रयोग मुलाखतीत ते बोलत होते. शिवाजीनगरमधील सवाई गंधर्व स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मंगेश वाघमारे यांनी त्यांना बोलते केले. 

‘‘पूर्वी मुख्य कलावंताला तबल्याची संगत असायची. आता त्याऐवजी जुगलबंदी-कुरघोडी असते,’’ असे सांगून काब्रा म्हणाले, ‘‘आधी श्रोते व कलावंतांना फुरसत असायची म्हणून तब्ब्येतीत संगीताचा आनंद दिला-घेतला जायचा. आता झटपट प्रस्तुतीचा काळ आहे.’’

आपल्या गुरूंबद्दल भक्तिभाव व्यक्त करत ते म्हणाले, ‘‘संगीत ही त्यांच्यासाठी पूजा होती. कमालीची स्मरणशक्ती असल्याने मी दरवेळी वाजवलेले सारे बारकाईने त्यांच्या लक्षात राहायचे. किती तरी दिवसांनंतर त्यातला कुठलाही मुद्दा त्या स्पष्टीकरणासाठी वापरत. सरोदवर श्रुतींच्या नेमक्‍या अभिव्यक्तीसाठी त्या सतारीवर वाजवून तसेच गायनातून योग्य काय, ते त्या दाखवत. त्या सांगायच्या, की उत्तम ऐका. उत्तम वाजवा. लोकांसाठी नव्हे, तर स्वतःच्या आनंदासाठी वाजवा. तरुण कलावंताना त्यांचा हा हाच संदेश मला द्यावासा वाटतो.’’

शेवटी सरोदवादनातून त्यांनी दरबारी, मालकंस, आसावरी या रागांची झलक दर्शवत श्री व मारवा रागातील रिषभातला फरकही दाखवला. बाबा अल्लाउद्दीन खाँसाहेब यांनी त्यांच्या बॅंडसाठी बांधलेली भैरवीगत वाजवून काब्रा यांनी समारोप केला. 

सुरवातीला पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर (दिग्दर्शक एस. बी. नायमपल्ली) व पंडित बिरजू महाराज (दिग्दर्शक चिदानंद दासगुप्ता) यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात आले. आर्य संगीत मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी स्वागत व मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Basant Kabra