#SawaiGandharvaMahotsav स्वरतृप्तीचा आनंद हृदयात साठवत समारोप (video)

sawai gandharava mahotsav
sawai gandharava mahotsav

पुणे - वृंदावनात रंगलेला सारंग, सतारीवरचा सिहेंद्र मध्यम, पं. भीमसेन जोशी यांची आठवण करून देणारे अभंग आणि अजय चक्रवर्ती यांनी फुलविलेला ‘भूप’ अशा दमदार सादरीकरणाने ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चैतन्यमय समारोप झाला आणि गेले पाच दिवस चाललेल्या या स्वरोत्सवाला मनात साठवून रसिकांनी स्वरतृप्तीचा आनंद घेतला.

सवाईच्या समारोपाच्या दिवशी, रविवारी पहिल्या सत्राची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या गायनाने झाली. शुद्ध सारंग रागातील ‘आइये सब मिल देवो मुबारक बतिया...’ ‘अब मोरी बात...’ ही रचना आणि नंतर द्रुत तीन तालातील तराणा पेश केला. त्यांच्या गायन शैलीला रसिकांची दाद मिळाली. ‘अवघाची संसार सुखाचा करीन...’ या अभंगाने त्यांनी समारोप केला. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), निरंजन लेले (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.  

गायिका रुचिरा केदार यांनी रंगविलेल्या गौडसारंगने दाद मिळविली. त्यांनी ‘सैंया मैंतो...’ आणि ‘पिहू पालन लागी मोरी...’ या बंदिशी त्यांनी पेश केल्या. पटदीप रागातील ‘ए होरी खेलत बिहारी...’ या रचनेबरोबरच तराणाही सादर केला. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अजिंक्‍य जोशी (तबला) यांनी साथसंगत केली. 

दुपारच्या सत्रात चंद्रशेखर वझे यांनी राग भीमपलासमधील ‘अब तो करम करो...’ या रचनेने राग विस्तार केला. त्यानंतर ‘गोरे मुख सो मोरा मन भावे...’ ही रचना पेश केली. ‘जा जा बदरवा जा...’ या बंदिशीचे त्यांनी राग दुर्गा, अभोगी, बिलासखानी तोडी, शंकरा या चार रागांमध्ये अनोखे सादरीकरण केले. पं. भीमसेन जोशी यांचा अभंग ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराज...’ गोपाल मोरी करुणा क्‍यूँ नहीं आयी...’ या रचना त्यांनी पेश केल्या. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या ‘सिहेन्द्रमध्यम’ या रागातील वैशिष्ट्यपूर्ण वादनाने रसिकांची मने जिंकली. नंतर राग ‘तिलक कामोद’ व ‘नट’ यांचे मिश्रण असलेला नवा राग त्यांनी सादर केला. पं. विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली. 

पं. भीमसेन यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांनी ‘मारूबिहाग’मधील अवीट गोडव्याचा आनंद देत, त्याचे रंग उलगडले. ‘हिंडोल बहार’ रागात ‘कोयलिया बोले’ ही बंदिश आणि नंतर याच रागातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, तसेच ‘इंद्रायणी काठी’ हा अभंग सादर केला. त्यास रसिकांनी दाद दिली. अजय चक्रवर्ती यांनी राग ‘भूप’मध्ये ‘प्रभू रंग मोहे सब’ या बंदिशीतून रागछटांची रसिकांवर बरसात केली. नंतर महादेव देव महेश्वर ही बंदिश आणि तराणा, त्यानंतर भजन सादर केले. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवळकर आणि संवादिनीवर अजय जोगळेकर यांनी साथसंगत केली.
 

प्रभा अत्रे आजारी असल्याने अनुपस्थित
महोत्सवाचा समारोप प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार होता; परंतु त्यांना दुखापत झाली असून, त्यांना बसता येत नसल्याने त्या गानसेवा करू शकणार नसल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली. त्यामुळे पं. भीमसेन जोशी यांच्या शिष्यांनी भैरवीने या महोत्सवाची सांगता केली.

आपल्या देशातील शास्रीय संगीताची परंपरा पाच हजार वर्षांची आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. ही परंपरा जतन करण्यासाठी तरुणांनीही प्रयत्न केले पाहिजेत. खूप रियाज करून आमच्यापेक्षा कैकपटीने अधिक चांगले गायला पाहिजे.
- अजय चक्रवर्ती, शास्त्रीय गायक

सवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com