'सवाई'त यंदा दिग्गजांचे स्मरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

"षड्‌ज', "अंतरंग'ची घोषणा; प्रदर्शनातून उलगडणार "तबकडी युग'

पुणे- भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळालेल्या कर्नाटकी गायिका सुब्बलक्ष्मी आणि शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांचे स्मरण केले जाणार आहे. त्यांच्यावर आधारित माहितीपट दाखविण्याबरोबरच "सवाई'चा पहिला आणि चौथा दिवसही त्यांना समर्पित करण्यात आला आहे.

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी "सवाई'तील "षड्‌ज' आणि "अंतरंग' महोत्सवाची घोषणा मंगळवारी केली. गणेशखिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारकात 7 ते 9 डिसेंबरदरम्यान सकाळी दहा ते दुपारी साडेबारादरम्यान हा महोत्सव होणार आहे, तर "सवाई' 7 ते 11 दरम्यान रमणबागेच्या पटांगणावर रंगणार आहे. तेथे "तबकडी युग' हे प्रदर्शनही यंदा पाहायला मिळणार आहे. जुन्या पिढीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या तबकडींची कव्हर या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. त्यासाठी छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी पुढाकार घेतला आहे.

व्ही. राजगोपाल दिग्दर्शित सुब्बलक्ष्मी यांच्यावरील आणि के. प्रभाकर दिग्दर्शित बिस्मिल्ला खान यांच्यावरील माहितीपट "षड्‌ज'मध्ये पहिल्या दिवशी दाखवले जाणार आहेत, तर तिसऱ्या दिवशी (ता. 9) फिरोज चिनॉय दिग्दर्शित वीणा सहस्रबुद्धे यांना अभिवादन करणारा माहितीपट आणि संवादिनीवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील धनंजय मेहेंदळे आणि ओंकार प्रधान यांचा माहितीपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

"अंतरंग'मध्ये सूरबहार वादक उस्ताद इर्शाद खान आणि गायक गणपती भट यांची (ता. 8) मुलाखत होणार आहे. त्यानंतर बासरीवादक भगिनी देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांच्या मुलाखतीने (ता. 9) "अंतरंग'चा समारोप होणार आहे.

गुंदेचा बंधूंना "वत्सलाबाई जोशी पुरस्कार'
"सवाई'त दरवर्षी "वत्सलाबाई जोशी पुरस्कार' प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी उमाकांत आणि रमाकांत गुंदेचा या गायकबंधूंची निवड करण्यात आली आहे. 51 हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याचे वितरण "सवाई'च्या दुसऱ्या दिवशी होणार आहे.

Web Title: sawai gandharva festival