#शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मिळणारी ५० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यातच जमा होईल. डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) पोर्टलद्वारे ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळेल. या योजनेंतर्गत महाविद्यालयांना दोन टप्प्यांत निधीची रक्कम मिळेल, असा निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मिळणारी ५० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यातच जमा होईल. डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) पोर्टलद्वारे ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळेल. या योजनेंतर्गत महाविद्यालयांना दोन टप्प्यांत निधीची रक्कम मिळेल, असा निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यातच शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत होती. आताही त्याचप्रमाणे डीबीटी पोर्टलद्वारे ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार असल्याचे राज्य सरकारने या वेळी जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह उच्च शिक्षण संचालकांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मागील आठवड्यात पुण्यात बैठक घेण्यात आली होती. पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील दोनशेहून अधिक प्राचार्य या बैठकीत सहभागी झाले होते. शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मिळणारा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी महाविद्यालयाच्या खात्यात जमा करण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी लावून धरली होती. त्यावर सोमवारी झालेल्या बैठकीतही चर्चा झाली. 

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातच जमा होईल, असे सरकारने स्पष्ट केले. महाविद्यालयांना मिळणारा परतावा ऑक्‍टोबर आणि फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत मिळेल, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक  डॉ. विजय नारखेडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेंतर्गत शिष्यवृत्ती निधी जमा झाल्यानंतर विद्यार्थी १५ दिवसांत, तर काही वेळा एक-दीड महिन्यांनंतरही हा निधी महाविद्यालयात जमा करतात. काही विद्यार्थी शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना देत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, सरकारने दिलेला निर्णय आम्ही मान्य करत आहोत, असे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. डीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती योजनेतील निधी संबंधित पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Web Title: Scholarship amount students account