‘शिष्यवृत्ती’च्या नियमांबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. परंतु शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा नसावी. वयाची अट घातल्यामुळे काही हुशार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून मुकण्याची शक्‍यता आहे.’’  
- के. एन. अरनाळे, मुख्याध्यापक, भावे हायस्कूल

पुणे - इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांच्या वयाची अट या वर्षीपासून निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक यांबरोबरच पालकांमध्येही संभ्रमावस्था आहे.

अकरापेक्षा अधिक वयाच्या मुलांचे अर्ज पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरून घेत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. यामुळे राज्यातील शेकडो मुले शिष्यवृत्ती परीक्षेला मुकण्याची शक्‍यता आहे.

शिक्षण विभागाने चौथी आणि सातवीऐवजी यंदा पहिल्यांदाच पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. एक जूनपर्यंत पाचवीसाठी ११ वर्षे आणि आठवीसाठी १४ वर्षे यापेक्षा अधिक वय नसावे, अशी अट आहे. दिव्यांगांना पाचवीसाठी १५ आणि आठवीसाठी अठरा वर्षांची वयोमर्यादा आहे. शिष्यवृत्तीस इच्छुक असणाऱ्या काही मुलांचे वय या अटीत बसत नसल्याने परीक्षेचे अर्ज भरून घेतले जात नाहीत, अशी पालकांची तक्रार आहे. यापूर्वी वयाची अट नव्हती. आतादेखील ती असू नये, अशी पालकांची मागणी आहे.  

काही मुख्याध्यापकांना वयाच्या अटीचा नियमच माहीत नाही. परीक्षेसंबंधीची अधिसूचना अनेकांनी वाचली नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे; परंतु शासन निर्णयाप्रमाणे वयोमर्यादेचा निकष पूर्ण होत नसल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास नकार मिळत असल्याचे चित्र आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील वयाच्या अटीबाबत प्रातिनिधिक स्वरूपात काही मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता, त्यांनीही वयाची अट नसावी, याला दुजोरा दिला.

परीक्षा देता येईल; पण शिष्यवृत्ती नाही
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिलीचे वय सहा असे निश्‍चित केलेले आहे. त्यानुसार पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ११ आणि आठवीसाठी कमाल वय १४ वर्षे ठरविले आहे. त्यापेक्षा कमी वय असेल आणि विद्यार्थी त्या वर्गात असेल, तर त्याला परीक्षेला बसता येईल आणि तो शिष्यवृत्ती मिळण्यासाठीदेखील पात्र ठरू शकतो; परंतु विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा विद्यार्थ्याचे वय अधिक असेल, तर त्याला परीक्षा देता येईल; मात्र शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास तो पात्र राहणार नाही. तशी सूचना ऑनलाइन अर्ज भरतानाच संगणकावर दिसणार आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले.

चुकीचा अर्ज भरल्यास कारवाई
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्याची जन्मतारीख शाळेच्या ‘जनरल रजिस्टर’वरून खात्री करून मुख्याध्यापकांनी अचूकपणे नोंदवायची आहे. चुकीच्या जन्मतारखेसह परीक्षेचा अर्ज भरल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. जन्मतारखेत बदल करायचा झाल्यास त्यासाठी निश्‍चित करून दिलेली योग्य प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतर जनरल रजिस्टरमध्ये बदल करून त्यानुसारच अर्जात जन्मतारीख नोंदवावी.’’

वयाची मर्यादा अडचणीची  
हुजूरपागा प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी म्हणाल्या, ‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या नव्या रचनेविषयी माहिती देण्यासाठी आम्ही नुकतीच पालकसभा घेतली होती. इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. आम्हाला अद्याप वयाची अडचण आलेली नाही. परंतु निश्‍चितच वयाची मर्यादा अडचणीची ठरू शकेल.’’

Web Title: scholarship rules confussion