‘शिष्यवृत्ती’चे विद्यार्थी घटणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

परीक्षेतील बदलामुळे परिणाम होण्याचा परिषदेचा अंदाज

पुणे - शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीपासून झाल्याने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत गेल्या परीक्षेच्या तुलनेत ३० टक्‍क्‍यांनी घट होण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी चौथीच्या वर्गांना पाचवीचा आणि सातवीच्या वर्गांना आठवीचा वर्ग जोडला गेला नसल्याने ही घट होईल, असा अंदाज राज्य परीक्षा परिषदेने वर्तविला आहे.

परीक्षेतील बदलामुळे परिणाम होण्याचा परिषदेचा अंदाज

पुणे - शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीपासून झाल्याने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत गेल्या परीक्षेच्या तुलनेत ३० टक्‍क्‍यांनी घट होण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी चौथीच्या वर्गांना पाचवीचा आणि सातवीच्या वर्गांना आठवीचा वर्ग जोडला गेला नसल्याने ही घट होईल, असा अंदाज राज्य परीक्षा परिषदेने वर्तविला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी एक तारखेपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली. परिषदेकडे आजपर्यंत पाच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. मागील परीक्षा ही चौथी आणि सातवीसाठी होती. दोन्ही वर्गातील विद्यार्थी मिळून १५ लाख ९८ हजार जणांनी ती परीक्षा दिली होती. आता परिषदेकडे दिवसाला ५० हजार अर्ज येत आहेत.

अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. विलंबशुल्कासह सात जानेवारीपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह परीक्षेपूर्वी १५ दिवस विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. तोपर्यंत आणखी पाच ते सहा लाख विद्यार्थ्यांचे अर्ज येतील, असा अंदाज परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, ‘‘परीक्षेसाठी सुरवातीला दिवसाला १० ते २० हजार अर्ज येत होते. परंतु, त्याचा वेग वाढला आहे. दिवसाला ५० हजार अर्ज भरले जात आहेत. अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी १० ते ११ लाख अर्ज येतील. गेल्या परीक्षेच्या तुलनेत त्यात घट झाली असेल.’’

विद्यार्थी संख्या घटण्याचे कारण विचारले असता पाटील यांनी सांगितले, की राज्यातील अनेक प्राथमिक शाळा चौथीपर्यंत होत्या. त्यांना पाचवीचे वर्ग जोडले गेलेले नाहीत. सातवीच्या वर्गांनादेखील आठवीचे वर्ग जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी चौथी आणि सातवीपर्यंत वर्ग आहेत, तेथील विद्यार्थी आता या परीक्षेला बसू शकणार नाहीत.

पाचवी आणि आठवीच्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चौथीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. परंतु, परीक्षा पाचवीसाठी झाल्याने विद्यार्थ्यांवरदेखील परिणाम होईल. चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवी आणि सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षी चित्र बदलेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक हजार आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक दीड हजार रुपये मिळत होते. परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी झाली. या बदलाबरोबरच पाचवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक पाच हजार आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळावी; तसेच शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार लोकसंख्येला पाच करावी, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाने राज्य सरकारला पाठविला आहे. दहा हजारांमागे तीन जणांना म्हणजे एकूण सुमारे ३३ हजार जणांना शिष्यवृत्ती दिली जाते. यात बदल झाल्यास सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल.

Web Title: scholarship student decrease