दप्तराचे ओझे कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - मला रोज मोठे दप्तर आणावे लागते. आम्हाला दररोज ९ तासिका असतात. ७ वह्या आणि सगळी पुस्तके आणावी लागतात. डबा, पाण्याची बाटली, रेनकोट- छत्री याचेही ओझे असते, त्यामुळे पाठ दुखते...सहावीत शिकणारा शंकर कदम हा विद्यार्थी सांगत होता. शंकरच्या वर्गातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी दप्तराच्या ओझ्यामुळे पाठ दुखत असल्याचे सांगितले. या वर्गातले ७-८ विद्यार्थी दररोज चालत शाळेत येतात. पंधरा-वीस मिनिटे पाठीवर इतके ओझे घेऊन चालत येण्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करणार, अशा घोषणा गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. त्यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या. शाळांनी त्यांच्या पातळीवर ओझे कमी करण्याचे प्रयोगही राबविले. मात्र, त्यात सातत्य नसल्याने आजही मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले नसल्याचे ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले. वह्या-पुस्तकांची संख्या कायम असल्याने दप्तराचे दररोजचे ओझे कायम असून, त्यातून विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने या शैक्षणिक वर्षात कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. 

यासंदर्भात शिक्षिका शीला सत्तूरवार म्हणाल्या, ‘‘वर्गातल्या कपाटात वह्या-पुस्तके ठेवली, तर तासाला आल्यावर ती विद्यार्थ्यांना वाटण्यात आणि तास संपल्यावर पुन्हा जमा करण्यातच खूप वेळ जातो. ३० मिनिटांच्या तासिकेतला निम्मा वेळ त्यातच गेला, तर आम्हाला शिकवायला किती वेळ मिळणार. विद्यार्थ्यांसाठी आम्ही ई-लर्निंगचा एक  पर्याय वापरत आहोत. आठवड्यातले काही तास ई-लर्निंगचे असतात, त्या दिवशी विद्यार्थ्यांना त्या विषयाच्या वही - पुस्तकाची फारशी गरज पडत नाही. या प्रयोगामुळे किमान आठवड्यातले दोन दिवस तरी काही विषयांच्या वह्या- पुस्तकांचे ओझे कमी होऊ शकते.’’ शाळेकडून आम्ही अनेक प्रयत्न करून पाहिले, तरी शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळेत येऊन, याबाबत काय अडचणी आहेत, ते पाहणे आवश्‍यक आहे, तरच या अडचणीवर काही मार्ग निघू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन करून २०१५ मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या. मात्र, खरोखरंच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले का, याची पाहणी शासनाकडून प्रत्येक शाळांमध्ये नियमितपणे झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सर्व वह्या-पुस्तके रोज शाळेतच ठेवली पाहिजेत. ज्या विषयांचा गृहपाठ दिला असेल, त्याच विषयांची वह्या - पुस्तके रोज घरी नेली पाहिजेत. मात्र, शाळेतच वह्या-पुस्तके ठेवण्यात अनेक अडचणी आहेत.
- रोहन डावळकर, विद्यार्थी

Web Title: school books weight