दापोडीतील हॅरिस पुलावर स्कूलबस जळून खाक 

दापोडीतील हॅरिस पुलावर स्कूलबस जळून खाक 

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडीमधील हॅरिस पुलावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मिनीबसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना वेळीच बसमधून बाहेर काढल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली. सोमवारी (ता. 10) दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे दापोडी-बोपोडी परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीकडून खडकीच्या दिशेने ही मिनीबस जात होती. हॅरिस पुलावर आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला व लगेच आग लागली. बसचालकाने जवळील बाटलीतील पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग चांगलीच भडकल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने बसमधील पाच-सहा विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांना बरोबर घेऊन तो निघून गेला. घटनेची माहिती कळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी आले. तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. चालक बस सोडून निघून गेल्यामुळे ती कोणत्या शाळेची होती, याबाबत पोलिसांना संध्याकाळपर्यंत माहिती मिळू शकली नाही. 

दरम्यान, पुलाच्या मधोमध ही घटना घडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही वाहनचालकांनी मुंबईकडे जाणाऱ्या बाजूने वाहने घुसवल्याने दुसऱ्या बाजूलाही कोंडी झाली. दुपारी तीनपर्यंत या परिसरातील वाहतूक अत्यंत मंदगतीने सुरू होती. 

महापौर अडकले कोंडीत 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांची गाडीही जवळपास दीड तास या कोंडीत अडकून पडली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्यानंतर महापौर नियोजित कार्यक्रमासाठी पुण्याकडे रवाना झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com