वर्ष संपले तरी परिवहन समिती कागदावरच

School-Bus-Safety
School-Bus-Safety

पिंपरी - शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शहरातील ३८० पेक्षा अधिक शाळांमध्ये परिवहन समिती कागदावरच राहिल्या आहेत. शिक्षण विभागाने सूचना करून शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिले आहेत.

विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे कशी होईल, याबाबत उपाय योजण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक विद्यालयात एक ‘परिवहन समिती’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक शाळेमध्ये मार्च २०१८ मध्येच समिती स्थापनेविषयी शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत. तरीदेखील तीन आसनी रिक्षांमध्ये १५-२० मुलांची वाहतूक होत असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. 

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी ते कोणत्या वाहनातून शाळेत ये-जा करतात याची नोंद सरकार पातळीवर राहावी, या उद्देशाने राज्य सरकारच्या परिवहन विभागाने २०११ मध्ये प्रत्येक शाळा अथवा महाविद्यालयात शालेय परिवहन समितीने तयार करणे बंधनकारक केले.

यातून विद्यार्थी वाहतुकीवर बारकाईने लक्ष दिले जाऊ शकते. मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. ‘स्पीड गव्हर्नर बसवण्यात आल्याने वेगाला मर्यादा येतात. यावर समिती लक्ष ठेवू शकते. 

शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष संबंधित शाळेचे मुख्याध्यापक असतील. शाळा परिसरातील वाहतूक पोलिस निरीक्षक अथवा ठाण्याचे पोलिस निरीक्षक, आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक, पालक संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचा प्रतिनिधी हे सदस्य असतील. 

दरम्यान, वर्ष संपत आले, तरी शहरात तीनशेहून अधिक शाळांमध्ये समितीची स्थापना झालेली नाही. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.

निम्म्याहून अधिक शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना झाली नाही, ही बाब खरी आहे. उर्वरित शाळांना परिपत्रक पाठवून समिती स्थापन करून शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

पालकांनी हे करावे 
विद्यार्थी पालकांसमोरच वाहनात बसतो. वाहनात विद्यार्थी संख्या जास्त आहे का, त्याची अंतर्गत रचना कशी आहे, हे पालक पाहू शकतात. संबंधित वाहनचालक नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करत नसेल, तर पालकांनी याची माहिती शाळेला द्यावी. शाळेकडून दखल घेतली नाही, तर आरटीओ प्रशासनाला संबंधित वाहन क्रमांक द्यावा. 

शहरातील शाळा 
  प्राथमिक शाळा :     १०५ 
  माध्यमिक शाळा :     १८ 
  अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळा  :     ६४८
  विद्यार्थी संख्या :     ३ लाख ४८ हजार ९५०
  स्कूलबस :     २ हजार ७९
  समिती स्थापलेल्या शाळा :     २५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com