शाळा, महाविद्यालयांत तक्रार पेट्या सक्तीच्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पुणे - विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणेच आता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविणे शालेय शिक्षण विभागाने सक्तीचे केले आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही पेटी मुख्याध्यापक, पोलिस आणि पालक प्रतिनिधींसमोर उघडण्याचे बंधनही टाकण्यात आले आहे.

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी शाळेच्या दर्शनी भागात वा प्रवेशद्वाराजवळ तक्रारपेटी बसविली पाहिजे. पेटी उघडल्यानंतर त्यात गंभीर वा संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारी असल्यास तत्काळ पोलिस यंत्रणेची मदत घेतली पाहिजे. तसेच, सर्व तक्रारींची नोंद घेऊन त्याचे निराकरण आणि त्यानुसार उपाययोजना कराव्यात. त्यासाठी शाळांना आवश्‍यकता भासल्यास शासनाकडून मार्गदर्शन मागविता येणार आहे.

महिला शिक्षिका वा विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या तक्रारी असल्यास त्या महिला तक्रार निवारण समितीसमोर तसेच, विद्यार्थी-विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवल्या पाहिजेत. समितीने त्यासंबंधी योग्य कारवाईसाठी निर्देश देण्याची सक्तीही केली आहे. प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेट्या बसविल्या आहेत की नाही, याचा आढावा घेण्याची जबाबदारी शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर टाकली आहे. शाळांनी तक्रार पेट्या बसविण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करायचा आहे. यासंबंधी परिपत्रक उपसचिव रा. ग. गुंजाळ यांनी जारी केले आहे.

Web Title: school, college complaint box compulsory