शाळा-महाविद्यालयांत महायोग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे - विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, संस्था, सोसायट्यांत योगासनांची प्रात्यक्षिके सादर करीत शहरात गुरुवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पसमध्ये सकाळी शबनम पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी योगाचे धडे घेतले. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले आदी उपस्थित होते.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानात स. प. तसेच टिळक महाविद्यालय, नूमवि प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, नूमवि मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, एसपीएम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. रणजित चामले यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. या प्रसंगी शिप्र मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, राधिका इनामदार, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, नगरसेवक धीरज घाटे व नगरसेविका स्मिता वस्ते आदी उपस्थित होते.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या परिसरात अंजली अग्निहोत्री यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली. डॉ. राजहंस यांचे ‘योग’ विषयावर व्याख्यान झाले. या वेळी ‘योग व तंदुरुस्ती’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

सदाशिव पेठेतील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाचा (आयसीएआय) पुणे विभाग आणि दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) यांच्या संयुक्‍त विद्यमाने योग आणि प्राणायम वर्गाचे आयोजन केले होते. सुमारे दोनशे सीए यात सहभागी झाले होते. प्रीतेश काळे, स्वाती शर्मा यांनी योगाभ्यास घेतला.

गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्या मंदिरात शिक्षकांनी मुलांना योगाचे महत्त्व सांगितले. या वेळी मुलांनी पद्मासन, ताडासन, वज्रासन, वृक्षासन, भुजंगासन इत्यादी आसने केली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. दीपाली गावडे यांनी योग दिनाची प्रार्थना मुलांकडून म्हणून घेतली. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एनईएमएम स्कूलमध्ये चार ते सहा वयोगटातील मुलांनी योगासने केली. शाळेच्या क्रीडा शिक्षिका स्वाती मर्चंट यांनी विविध योगासने करून दाखवली. 

शनिवार पेठेतील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगीता मणियार यांनी हास्ययोग, सुपर ब्रेन योग प्रात्यक्षिकांसह सादर केले. 
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठात योग प्रशिक्षण शिबिर झाले.

शिवाजीनगर येथील पीईएस मॉर्डन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर चौथीपर्यंतच्या मुलांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या वेळी मुलांकडून वज्रासन, पर्वतासन, ताडासन अशी विविध आसने करून घेण्यात आली. हास्य योगाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: school college yog day