रेशन दुकानात आता  शालेय साहित्यही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

 राज्यातील रेशन दुकानात आता शालेय साहित्यदेखील मिळणार आहे. रेशनधान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी रेशन दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू व शाळेसाठी उपयुक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 

पुणे - राज्यातील रेशन दुकानात आता शालेय साहित्यदेखील मिळणार आहे. रेशनधान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी रेशन दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू व शाळेसाठी उपयुक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 

रेशन दुकानातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित होणाऱ्या वस्तूंसह गहू व तांदूळ यांच्या विशिष्ट जाती, खाद्यतेल, कडधान्ये, डाळी, गूळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपाला आदी खुल्या बाजारातील वस्तू तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ, प्रमाणित बी-बियाणे, कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ यांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तूंची विक्री करण्यास सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता त्याच धर्तीवर राज्यातील सर्व रेशन दुकानांमधून स्टेशनरी वस्तू व शाळेसाठी उपयुक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन, याबाबत रेशन दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा, हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये राहील, यात सरकारचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यात काही हजार रेशन दुकानदार आहेत. शहराबरोबरच अतिदुर्गम भागातदेखील या दुकानांचे परवाने देण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School materials now in the ration shop

टॅग्स