स्‍कूल चले हम...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. या गोंधळातच उन्हाळी सुट्यांच्या सुमारे दीड महिन्याच्या खंडानंतर उद्या (ता. १५) शाळा सुरू होणार आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या १५२ शिक्षकांना शाळा आणि सुमारे ८० शाळांना एकही शिक्षक मिळालेला नाही. या शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकाअभावी कुलूपबंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे एकही शाळा शिक्षकाअभावी बंद राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाबपुष्पाने उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत, तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हारून आतार यांनी गुरुवारी सांगितले. 
राज्य सरकारने यंदा प्रथमच प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा (जिल्ह्याबाहेर बदली) आणि जिल्हांतर्गत (जिल्ह्यातल्या जिल्ह्यात) बदल्यांसाठी राज्यस्तरावर ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. पहिल्यांदा आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्यापही या बदल्यांचा गोंधळ पूर्णपणे मिटू शकलेला नाही. बदल्यांच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ६५५ शिक्षक विस्थापित (शाळेवर नियुक्ती न मिळालेले) झाले होते. आतापर्यंत त्यापैकी सुमारे ५०० जणांना नियुक्ती मिळाली आहे.
 अद्याप १५२ जण विस्थापित आहेत. एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील दांपत्य, एकल आणि पती- पत्नी असे दोघेही अशांचा विस्थापित झालेल्यांमध्ये समावेश आहे. या बदल्यांसाठी खो-खो पद्धत वापरण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना ‘खो’ मिळाला; पण त्यांना नवीन शाळा मिळू शकलेली नाही.

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी आजी- माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. 
- हारून आतार, प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: school start education