किलबिलाट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा ‘युनिफार्म’... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवले झालेले चेहेरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी...  अशा वातावरणात आणि किलबिलाटात शुक्रवारी शाळा पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.

पुणे - नवी कोरी पुस्तकं, वह्या... नव्या मित्र-मैत्रिणी... नवीन वर्गात बसण्याची उत्सुकता... नवा ‘युनिफार्म’... काहींसाठी तर नवी शाळा... मनात थोडीशी भीतीही... शाळेचे नाव काढताच रडवले झालेले चेहेरे... रडणाऱ्या मुलांना वर्गात बसविण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप... विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी केलेली जय्यत तयारी...  अशा वातावरणात आणि किलबिलाटात शुक्रवारी शाळा पुन्हा एकदा बोलक्‍या झाल्या.

राज्यभरातील शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस होता. ‘शाळा म्हणजे आई-वडिलांपासून लांब जाणं’ ‘शाळा म्हणजे कडक शिक्षक’, ‘शाळा म्हणजे फक्त अभ्यास’ काहीशा अशा वातावरणात आणि रडविलेल्या चेहऱ्यांनी काहींचे शाळेत पहिले पाऊल पडले. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये ‘सकाळ’च्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, चॉकलेट्‌स आणि गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
मंगलमूर्ती मोरयाचा जयजयकार.... हिप हिप....हुर्रे... भारत माता की जय...’ अशा घोषणा देत आणि हवेत फुगे सोडत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेत पहिला दिवस साजरा केला. नवा गणवेश परिधान करून आलेल्या या मुलांनी नवे मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांशी गट्टीदेखील केली. या शाळेतील विद्यार्थ्यांनाही ‘सकाळ’तर्फे गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देण्यात आले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली ठाकर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आभा तेलंग, निरंजन सेवाभावी संस्थेचे जयेश कासट या वेळी उपस्थित होते. 

नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत डोरेमोन, मिकी माऊस, छोटा भीम यांची वेशभूषा केलेल्या कलाकारांचे आगमन होताच रडविलेल्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलले. आई-वडिलांपासून दूर जाण्याच्या भीतीने रडू कोसळलेल्या मुलांना शाळेतील जल्लोष पाहून हसू फुटले. अवघ्या काही क्षणात रडू विसरून इयत्ता पहिलीत प्रवेश केलेली मुले शाळेतील नवे मित्र, वर्ग, शाळेचे पटांगण यामध्ये रुमून गेली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ, शाला समिती अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, डॉ. विनयकुमार आचार्य, डॉ. स्वाती जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

नूतन मराठी विद्यालय (मुलांचे)
शाळेच्या पहिल्या दिवशी ‘सकाळ’च्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थांनी या वेळी एकच जल्लोष केला आणि ‘सकाळ’च्या टीमसोबत धम्माल केली. मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जनमित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले, पर्यवेक्षिका शीला सत्तूरपार आदी उपस्थित होते.

मी यावर्षी माध्यमिक शाळेत आलोय, त्यामुळे मला छान वाटतेय. नवीन शिक्षक, नवीन मित्र कसे असतील याबद्दल उत्सुकता आहे. नवीन वर्ग, नवीन  विषय... हे सगळंच खूप आनंददायी आहे.
- आर्यन काशीद, पाचवीचा विद्यार्थी

शाळा सुरू झाल्यामुळे आता मित्रांबरोबर खूप खेळता येणार आहे. माझ्या एका पायाला व्यंग असले तरी मित्र आणि शिक्षक मला खूप मदत करतात.
- मोहित पाटील, दिव्यांग विद्यार्थी 

मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस खास असतो, त्यामुळे आज ऑफिसमधून सुटी घेऊन मुलाला सोडायला शाळेत आले आहे. नवीन विषयांचा अभ्यास मुलांकडून करून घेणे, हे एक आव्हान आहे. 
- देवयानी अंबिके, पालक

व्हिडिओ पहा - www.esakal.com

Web Title: school start student