उत्साहाची शाळाघंटा

पहिला दिवस, नवा बेंच अन्‌ नवी मैत्रीण... काय धमाल करायची याची ही खलबतं होताहेत.
पहिला दिवस, नवा बेंच अन्‌ नवी मैत्रीण... काय धमाल करायची याची ही खलबतं होताहेत.

पिंपरी - नवा गणवेश, नवा वर्ग, नवीन छत्री, नवीन दप्तरे, पाटी पेन्सिल, वॉटरबॅग, नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक, नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (ता. १७) शाळेची पहिली घंटा वाजली. उन्हाळी सुटीतील मौजमजेनंतर मुले शाळेत दाखल झाली अन्‌ बाळगोपाळांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा ‘श्रीगणेशा’ आज झाला. शाळांचा पहिला दिवस मुलांच्या किलबिलाटाने गजबजला.

हजारो चिमुकली पावले... कुणी हसत हसत, तर कुणी रडत पडत शाळेची पहिली पायरी चढले. वर्गात नानाविध खेळण्याचा पसारा आणि खाऊचीही रेलचेल पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी आपल्या आईवडिलांसह रडत रडत शाळेच्या बाकावर ही चिमुकली स्थिरावली. महापालिका शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण आणि ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. 

दीड महिन्यांच्या सुटीनंतर राज्य मंडळाच्या हजारो शाळांचे प्रवेशद्वार सोमवारी उघडण्यात आले. बहुतांश शाळा परिसरात सुटी संपण्याआधीच स्वच्छता अभियान राबवत वर्ग, आवार चकाचक करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले.

मुलांना शाळेचे वातावरण आल्हाददायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मंडळींना खास निमंत्रण देण्यात आले होते. एवढे सारे असूनही चिमुकले बावरलेले होतेच. नव्याची नवलाई असली तरी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांना सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आईवडिलांना काही सोडवत नव्हते. प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन मित्रांच्या संगतीने शाळेतला पहिला दिवस घालवला; तर काही मुले नवीन वर्गातील आपला बाक ठरविण्यासाठी धडपडत होते. नवीन वर्गातील नवीन वर्गशिक्षक आणि नवीन सजावटीची उत्सुकता या विद्यार्थ्यांनी अनुभवली. नवीन वर्गात आपला ‘बेंचमेट’ कोण, याविषयी मुलांच्या चर्चा रंगल्या होत्या. 

पुस्तके मिळाली; साहित्याची प्रतीक्षा
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके देण्याबरोबरच शालेय साहित्य देण्याचाही उपक्रम महापालिकेचा आहे. यंदा सर्व विषयांची पुस्तके मुलांना पहिल्या दिवशी मिळाली. एकीकडे खासगी शाळांचा पहिला दिवस ‘आनंददायी’ ठरत असताना, दुसरीकडे मात्र, दरवर्षीप्रमाणे महापालिका प्रशासनाच्या अनास्थेपोटी कोट्यवधीचा निधी असूनही विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर उपस्थित राहावे लागले. पायात बूट नव्हते. पुस्तके ठेवण्यासाठी दप्तर नव्हते. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या ३७ हजार विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिउजाडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com