बारामतीत विद्यार्थी गणवेशाविना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

बारामती शहर - नगरपालिकेच्या शाळेतील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. नगरपालिकेने शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर गणवेशाची निविदा काढून आपली कार्यक्षमता (?) सिद्ध केली आहे. गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास सप्टेंबर महिना उजाडला होता. 

दरवर्षी नगरपालिकेतर्फे नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन जोड, दप्तर, बूट व सॉक्‍स असे साहित्य मोफत दिले जाते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाते. जून महिन्यात शाळा सुरू होणार याची माहिती असूनही नगरपालिका प्रशासन शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहून निविदा प्रक्रिया सुरू करते. यामुळे बारा महिन्यांमधील तीन- चार महिने विद्यार्थ्यांना एकतर जुना गणवेश किंवा तो खराब झाला असेल, तर दुसरेच कपडे गणवेशाऐवजी परिधान करावे लागतात. 

गतवर्षीही निविदा प्रक्रिया वेळेवर न झाल्याचे पडसाद उमटले होते. यंदा त्यापासून धडा घेत जानेवारी फेब्रुवारीमध्येच ही प्रक्रिया सुरू करणे गरजेचे असतानाही नगरपालिकेने शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी निविदा प्रसिद्ध करून कार्यक्षमता दाखवून दिली. मुख्याधिकाऱ्यांची यात जबाबदारी असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना निधीची तरतूद असूनही प्रशासनाच्या गलथानपणामुळे आता गणवेशाची वाट पाहत बसावी लागणार आहे.

किमान दोन महिने तरी लागणार
निविदाप्रक्रिया पूर्ण करून प्रारंभ प्रमाणपत्र दिल्यानंतरही दोन हजार विद्यार्थ्यांना वेगाने गणवेश द्यायचे झाले, तरी दोन महिन्यांचा कालावधी लागणार हे उघड आहे. याबाबत कारणांची जंत्री यानंतर प्रशासनाकडून पुढे केली जाईल, मात्र यात ज्यांच्यामुळे दिरंगाई झाली आहे, त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: school student without uniform