शिवनगर शाळेचे कौतुक राज्याच्या पथकाकडून शाळेची पाहणी (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
मंगळवार, 1 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): सुशोभित बगीचात विविध प्रकारची झाडे, झाडांच्या फांद्यांवर विविध पुस्तके लटकविल्याने सहज उपलब्ध झालेले ग्रंथालय, परिसरातील स्वच्छता, त्यात विद्यार्थ्यांनी लळा लावलेल्या चिमण्यांचा किलबिलाट पाहून राज्यातील शिक्षक भारावून गेले होते.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): सुशोभित बगीचात विविध प्रकारची झाडे, झाडांच्या फांद्यांवर विविध पुस्तके लटकविल्याने सहज उपलब्ध झालेले ग्रंथालय, परिसरातील स्वच्छता, त्यात विद्यार्थ्यांनी लळा लावलेल्या चिमण्यांचा किलबिलाट पाहून राज्यातील शिक्षक भारावून गेले होते.

टाकळी हाजी (ता. शिरूर) शिवनगर जिल्हा परिषदेच्या शाळेचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील 72 शिक्षकांची टीम आली होती. मागील वर्षी या शाळेला राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ भारत व स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील स्वच्छ भारत व स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त करणारी ही एकमेव शाळा आहे. राज्य पातळीवरील पथकाने शिवनगर शाळेतील विविध उपक्रम, स्वच्छतागृह, सुविधा व शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम, प्रयोग व प्रात्यक्षिके सादर केली. पथकातील टीमने विद्यार्थ्यांना विविध प्रश्‍न विचारून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक ढोल लेझीम खेळाला चांगला प्रतिसाद दिला.

मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे म्हणाले, ""गुणात्मक विद्यार्थी घडवीत असताना संस्कृतीला अधिक महत्त्व दिले आहे. घडविलेला विद्यार्थी हा शाळेचा मुख्य पाया समजून येथील भौतिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. निर्सगातील चिमणी वाचविणे हा प्रयोग यशस्वी करण्यात विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.''

या कार्यक्रमासाठी औरंगाबाद शिक्षण विभागाच्या उपसंचालक वैशाली कांबळे, शाळा सिद्धी कार्यक्रमाचे असिफ शेख, युनिसेफचे अशोक घोडके, संदीप तेंडुलकर, महादेव माळी, केंद्रप्रमुख दत्तात्रेय शिंदे, रंजना खोमणे, प्रशांत चोरे, तुकाराम घोडे, बाळासाहेब कानडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा घोडे यांनी केले. बाळासाहेब थोरात यांनी आभार मानले.

Web Title: School Surveys from Shivnagar School in shirur taluka