व्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी

व्हरांड्याचे छत कोसळून ४ विद्यार्थी जखमी

गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास राऊत (चौथी), करण रेश्‍माजी वाघमारे (दुसरी) अशी जखमींची नावे आहेत. यातील हर्षदा पोटे हिला १३ टाके पडल्यामुळे ती सोडून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती शिक्षक मनोज सटाले यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. या ठिकाणी तीन वर्गखोल्या नवीन बांधलेल्या आहेत. पण, चार वर्गखोल्या सुस्थितीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची बसण्याची अडचण आहे. जागेअभावी एक वर्ग व्हरांड्यात बसविला जातो. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास व्हरांड्याचे छत कोसळले. आवाजामुळे व दगडविटांच्या खाली मुले सापडल्यामुळे एकच आक्रोश झाला. ग्रामस्थ व आजूबाजूचे लोक जमा झाले. नशिबाने दुपारी जेवणाची वेळ असल्यामुळे मुले शाळेच्या बाहेर होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा दुरुस्तीसाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी दीड लाख रुपयांचा निधी १६ ऑगस्ट २०१८ रोजी पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी दिली. 

याची खबर तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना मिळाल्याबरोबर त्यांनी १०१ रुग्णवाहिका सांगून, तसेच तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात बारामती-दौंड उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सभापती अर्चना जाधव, राष्ट्रवादीचे सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे, शिवाजी साळुंखे, विठ्ठल मोकाशी, अनिल उरवणे, रामभाऊ बोरकर, अजित बोरकर, बाळासाहेब बोरकर, चंद्रकांत बोरकर, अण्णा डांगे आदी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांना ही बातमी समजल्यानंतर तहसीलदार अतुल म्हेत्रे यांना तातडीने मदत करण्याची सूचना केली. 

पंचायत समितीने दिलेला निधी पुरेसा नाही. या ठिकाणची इमारत दुरुस्ती करण्यासारखी नसून ही इमारत पाडून नवीनच करणे गरजेचे असल्यामुळे ग्रामपंचायतीने हा निधी दुरुस्तीसाठी वापरला नाही. नवीन खोल्या बांधण्यासाठी निधी गोळा करण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ होते, असे असताना हा अपघात झाला.
- रामभाऊ बोरकर, माजी सरपंच 

पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी दुरुस्तीसंदर्भात निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अपघाताला सामोरे जावे लागले.
- विठ्ठल मोकाशी, माजी संचालक, बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com