''विज्ञान संवाद वाढवायला हवा'' : खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे मत 'नासा'तील भारतीय वंशाचे खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन यांनी व्यक्त केले. 

पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे मत 'नासा'तील भारतीय वंशाचे खगोलजीवशास्त्रज्ञ डॉ. पराग वैशंपायन यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 'ब्ल्यू मार्बल स्पेस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (अमेरिका), 'प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे 'मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने 'खगोलजीवशास्त्र' विषयावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन शनिवारी झाले. या वेळी 'इस्रो'-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'स्पेस टेक्‍नॉलॉजी सेल'चे संचालक प्रा. एम. सी. उत्तम, 'इस्रो'च्या 'सॅटेलाइट सेंटर'मधील डॉ. श्‍यामा नरेंद्रनाथ, सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव श्‍यामकांत देशमुख, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते. 

"खगोलशास्त्राबद्दल अनेकांना कुतूहल असते, परिणामी अंतराळातील घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न खगोलप्रेमींकडून केला जातो. परंतु खगोलजीवशास्त्राबद्दल म्हणावी तितकी जागरूकता आपल्याकडे नाही. म्हणून विज्ञान संवाद वाढविण्याची गरज आहे,'' असे डॉ. वैशंपायन यांनी सांगितले. "खगोलजीवशास्त्र आणि पर्यावरण' विषयावर त्यांचे व्याख्यान या वेळी झाले. ''भारतातही खगोलजीवशास्त्राबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. परंतु खगोलजीवशास्त्रातील संशोधनाला अधिक निधी असायला हवा'.',असे एम. सी. उत्तम यांनी अधोरेखित केले. "खगोलजीवशास्त्रातील आव्हाने' विषयावर त्यांनी विचार मांडले. 

या परिषदेत 'युके सेंटर फॉर ऍस्ट्रोबायलॉजीचे चार्ल्स कॉकेल', 'ऑस्ट्रियातील मेडिकल युनिर्व्हसिटी ऑफ ग्राजचे ख्रिस्टन मॉयस्सेल', 'न्यूझीलंड ऍस्ट्रोबॉयोलॉजी नेटवर्क'चे संचालक डॉ. हॅरिटीनी मोगोसानू, गोव्यातील 'ऍस्ट्रोप्रोजेक्‍ट'चे संस्थापक राकेश राव यांसह अन्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. "खगोलजीवशास्त्र आणि पर्यावरण', "खगोलरसायनशास्त्र आणि रसायनशास्त्र', "खगोलजीवशास्त्राची व्याप्ती आणि नागरिकांचा सहभाग', "खगोलजीवशास्त्र आणि खगोलरसायनशास्त्र', "खगोलजीवशास्त्राची पुढील वाटचाल' अशा विषयावर चर्चासत्रे झाली.  
 

Web Title: "Science Communiation must be expanded": Astronomist Dr. Parag Vishpayan