
Pune : ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
पोंधवाडी (ता.इंदापूर) : भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे हा आहे. या सोबतच विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे महत्वाचे काम विज्ञान प्रदर्शनातून केले जाते.
विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासोबतच देशातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संधी देऊन त्यांचे आणि देशाचे भविष्य उज्वल करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवा यासाठी पोंधवाडी येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नुकतेच विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील २५ निवडक विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, बायोगॅस, वीज निर्मिती आणि पवनऊर्जा अशा विविध विषयांवर लक्षवेधी विज्ञान प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त अभिजित यमगर यांनी केले.

Dnyandeep English Medium School
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषयाच्या शिक्षिका रुपाली मींड मॅडम यांनी केले तर आयोजन ज्ञानदीप इंग्लिश मिडीयमच्या सर्व शिक्षक वृंदानी केले होते.
प्रदर्शन पाहिल्या नंतर हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अद्यक्ष यमगर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.