वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी विनोबा भावे आग्रही - मिलिंद बोकील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आचार्य विनोबा भावे यांची ओळख केवळ महात्मा गांधी यांचे शिष्य एवढ्यापुरती मर्यादित नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही विनोबा भावे यांचे कार्य खूप मोठे आहे. श्रमाकडे त्यांनी प्रतिष्ठा म्हणून बघितले. ते चांगले गणिती होते. त्यांचा विज्ञानावर विश्वास होता. संकटसमयी न डगमगता केलेली कृती ही अहिंसाच असते, असे त्यांचे विचार होते, असे मत लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले.

पुणे - आचार्य विनोबा भावे यांची ओळख केवळ महात्मा गांधी यांचे शिष्य एवढ्यापुरती मर्यादित नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही विनोबा भावे यांचे कार्य खूप मोठे आहे. श्रमाकडे त्यांनी प्रतिष्ठा म्हणून बघितले. ते चांगले गणिती होते. त्यांचा विज्ञानावर विश्वास होता. संकटसमयी न डगमगता केलेली कृती ही अहिंसाच असते, असे त्यांचे विचार होते, असे मत लेखक मिलिंद बोकील यांनी व्यक्त केले.

आचार्य विनोबा भावे यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त मुलांच्या पेरूगेट भावे स्कूलमध्ये "विनोबा भावे : एक उत्तम शिक्षक' या विषयावर बोकील यांचे बुधवारी व्याख्यान झाले. या वेळी शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख, बालसाहित्यकार राजीव तांबे, भावे शाळेचे प्राचार्य रोहिदास भारमळ, "संवाद पुणे'चे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, मुकुंद तेलीचेरी उपस्थित होते.

बोकील म्हणाले की, जयप्रकाश नारायण यांनासुद्धा आचार्य विनोबा भावे यांनी विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले होते. भावे यांच्या मते विज्ञानच जीवनाचा मुख्य भाग असतो, जगण्याचा पाया असतो. मनुष्याची प्रगती विज्ञानामुळेच झाली आहे. प्रत्येकाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते.

अ. ल. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात विनोबा भावे यांची वाचनाची आवड, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि आत्मविश्वास या गुणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विनोबा भावे यांच्यावर त्यांचे आजोबा आणि आईचा प्रभाव होता, हे सोदाहरण स्पष्ट केले. राजीव तांबे यांनी विनोबा भावे यांच्या आश्रमातील आठवणींना उजाळा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientific approach Vinoba Bhave Milind Bokil