भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येबद्दल ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी केला दावा; काय ते वाचा सविस्तर

सम्राट कदम
बुधवार, 15 जुलै 2020

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे डॉ. इयान कुपर आणि इंग्लंडच्या एसेक्‍स विद्यापीठाच्या डॉ. अर्घा मोंडल व डॉ. चेरीस आँटोनोपोलस यांनी भारतासह इटली, दक्षिण कोरिया आणि इराण मधील जून पर्यंतच्या कोरोना प्रसारावर संशोधन केले आहे. 
‘आर्काईव्ह’ या प्रिप्रिंट शोधपत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 

पुणे - देशात अजूनही कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांक पातळी गाठलेली नाही. त्यासाठी वेळ तर लागेल, पण जेंव्हा ही पातळी गाठली जाईल तेंव्हा रूग्णसंख्या वाढीची तीव्रताही गंभीर असेल, असा दावा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे डॉ. इयान कुपर आणि इंग्लंडच्या एसेक्‍स विद्यापीठाच्या डॉ. अर्घा मोंडल व डॉ. चेरीस आँटोनोपोलस यांनी भारतासह इटली, दक्षिण कोरिया आणि इराण मधील जून पर्यंतच्या कोरोना प्रसारावर संशोधन केले आहे. 
‘आर्काईव्ह’ या प्रिप्रिंट शोधपत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 

कोरोना संशयित, बाधित आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येवर आधारित ‘एसआयआर’ सिम्यिुलेशनचा वापर शास्त्रज्ञांनी केला आहे. आजवरचे सर्वांत विश्वासार्ह गणिती मॉडेल म्हणून याकडे बघितले जाते.

Image may contain: text

उच्चांक गरजेचा का?
संसर्गजन्य आजारांचा प्रसार आणि उपचार घेणारी रूग्णसंख्या टेकडीसारखा आलेख दर्शवते. म्हणजे एकदा ही रुग्णसंख्या उच्च पातळीवर पोचली की ती कमी व्हायला सुरवात होते. अशा वेळीच संसर्गजन्य आजार किती दिवस राहणार याचे पुढचे अनुमान बांधता येते. परंतु निष्काळजीपणा केला तर आजाराची दुसरी लाट येऊ शकते.   

असे झाले संशोधन

 • ३० जून पर्यंतची कोरोना संबंधीची आकडेवारीचे संकलन.
 • संभाव्य, बाधित आणि बरे होणारे रुग्ण यांच्या संख्येवर गणिती प्रक्रिया. 
 • त्याआधारावर सप्टेंबर २०२० पर्यंतचे भाकीत करण्यात आले. 

निष्कर्ष

 • देशात अजूनही कोरोनाच्या उपचार घेणाऱ्या रूग्णसंख्येने उच्चांक नाही.
 • नवीन बाधितांमुळे संशयित रूग्णसंख्येत वाढ.
 • ॲक्‍टीव रूग्णसंख्येची उच्चांक गाठल्यानंतर ५ महिन्यांनी देशातील रूग्णसंख्येचा दर ५०० च्या खाली येईल.

संशोधनाच्या मर्यादा

 • जून पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे मांडलेले गणितीय मॉडेल.
 • फक्त सप्टेंबर पर्यंतच्या प्रसाराचे अनुमान.
 • भारतात रुग्ण संख्येचा उच्चांक केंव्हा असेल आणि संख्या किती असेल याबद्दल अध्ययन नाही.
 • संशयित, बाधित, मृत्यू आणि बरे होणारे कोरोना रूग्ण यांच्या वाढीचा कल मांडण्यात आला आहे. 

उपाययोजना 

 • कोरोनाचा प्रसार कमी झाला तरी तो गेला असे समजू नये.
 • काँटेक्‍ट ट्रेसिंग, चाचण्यांचा वेग, रुग्णांचे विलगीकरण आणि आरोग्यव्यवस्थेची सज्जता आवश्‍यक.
 • लस येईपर्यंत नागरिकांनी सर्व सूचनांच पालन करणे आवश्‍यक.

बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करा
देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे; मात्र यावरील उपचारांसाठी औषधांचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचाराचा वापर वाढवावा, तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करावे, अशी मागणी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) केली आहे. प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत महाराष्ट्रातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत चाचण्या करण्यात आल्या. गंभीर कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी उपचार ठरली आहे. तरीही महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये याचा पुरेसा वापर केला जात नाही. प्लाझ्मादाते पुरेशा संख्येत उपलब्ध नसल्यामुळे असे घडत असल्याने कोरोनामधून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देणे बंधनकारक करावे, असे ‘आयएमए’ने म्हटले आहे

प्लाझ्मा दानात नियमांचे अडथळे
कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) काही नियम घातले आहेत; मात्र हे नियमच प्लाझ्मा दानात अडथळे ठरत असल्याचे समोर येत आहे. शिवाय कोरोनामुक्त झालेले रुग्ण कोरोनाच्या भीतीने पुन्हा रुग्णालयात जाण्यास घाबरतात. या सर्व बाबींमुळे प्लाझ्मादानास अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. प्लाझा थेरपीच्या दराबाबत नियमावली केल्यास राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना तसे दर आकारणे बंधनकारक असेल. रुग्णांनाही अधिक किंमत मोजावी लागणार नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात म्हणाले.

राज्यात ९७ टक्के मृत्यू कोरोनामुळे
कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. राज्यात गेल्या चार महिन्यांत एकूण दहा हजार ७८० मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यातील दहा हजार ४८२ म्हणजे ९७ टक्के मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाले आहेत. केवळ २९८ म्हणजे २.८ टक्के मृत्यू हे कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ११ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण ८ मार्च रोजी पुण्यात आढळला; तर १७ मार्चला मुंबईत पहिला कोरोनाबळी गेला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists from Australia and England have claimed the number of corona cases in India