भंगाराचा व्यवसाय उघड्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

चिखली - कुदळवाडी-जाधववाडी परिसरातील अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांवर शुक्रवारी (ता. २८) करण्यात आलेल्या कारवाईचा भंगार व्यावसायिकांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पत्र्याचे शेड पाडल्यानंतरही मोकळ्या जागेत उघड्यावर व्यावसायिकांनी काम सुरू केले आहे. 

चिखली - कुदळवाडी-जाधववाडी परिसरातील अनधिकृत भंगार मालाच्या गोदामांवर शुक्रवारी (ता. २८) करण्यात आलेल्या कारवाईचा भंगार व्यावसायिकांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पत्र्याचे शेड पाडल्यानंतरही मोकळ्या जागेत उघड्यावर व्यावसायिकांनी काम सुरू केले आहे. 

भंगार व्यवसायामुळे चिखली-मोशी परिसरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागामालकांकडून मोकळी जागा भाड्याने घ्यायची, त्याला चार बाजूने पत्र्याचे शेड घालायचे आणि भंगार माल आणून गोदाम भरायचे, भंगाराचे वर्गीकरण केल्यावर कचरा रस्त्यावर फेकायचा. कचऱ्याचे ढीग साठले की त्याला अचानक आग लागायची. या प्रकाराबाबत नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर आणि अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर शुक्रवारी प्रथमच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.  जाधववाडीतील रिव्हर रेसिडेन्सीच्या बाजूला इंद्रायणी नदीपात्रालगतच्या १०७ हून अधिक भंगार मालाच्या गोदामावर कारवाई झाली. त्यात पत्र्याचे गोदाम जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेने दाखवलेल्या धाडसामुळे पर्यावरणप्रेमी आणि येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. पोलिस बंदोबस्त मिळेल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याचे संकेतही महापालिका प्रशासनाने दिले होते.  

मात्र, कारवाईनंतर भंगार माल तसाच ठेवण्यात आला. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी शेडशिवाय उघड्यावर व्यवसाय सुरू केले आहे. त्यामुळे एवढी मोठी कारवाई करूनही फारसा उपयोग झाला नसल्याचे नागरिकांची भावना आहे.

पोट भरण्याचा व्यवसाय आहे. घाणीचा कचरा साफ करण्याचे काम आम्ही करतो. यावर दहा लोक अवलंबून आहेत. महापालिकेने येथून हटविले, तरी दुसऱ्या  ठिकाणी भाड्याने जागा घेऊन काम सुरू ठेवावे लागेल.
- सलमान शेख, भंगार व्यावसायिक

लाखो रुपये खर्चून घर घेतले. मात्र, प्रदूषणामुळे त्रस्त झालो आहोत. फक्त शेड न पाडता प्रदूषणकारी भंगार व्यवसाय हद्दपार करायला हवे आहेत. महापालिकेने प्रथमच कारवाई सुरू केल्याने समाधानी आहोत.
- मल्हारी दुधाळ

नागरिकांच्या आशेवर पाणी
चिखली-मोशी दरम्यानच्या पट्ट्यात बहुतांश गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, या भागातील भंगार व्यावसायिकांकडून कचरा, रद्दी, प्लॅस्टिक, रबर जाळले जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुराचा नागरिकांना त्रास होत होता. अतिक्रमण कारवाईनंतर तो कमी होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, प्रदूषण मुक्तीच्या आशेवर पाणी फिरले.

Web Title: scrab business open