धगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही

पीतांबर लोहार
शुक्रवार, 22 मार्च 2019

पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग सोसण्यापेक्षा फ्लॅट विकलेला बरा, अशी अगतिकता चिखली-मोशी परिसरातील सदनिकाधारकांनी व्यक्त केली.

पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग सोसण्यापेक्षा फ्लॅट विकलेला बरा, अशी अगतिकता चिखली-मोशी परिसरातील सदनिकाधारकांनी व्यक्त केली.

चिखली-मोशी पट्ट्यात देहू-आळंदी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत. विकास आराखड्यातील चिखली-मोशी रस्त्याचे काम सुरू आहे. एकीकडे अशी स्थिती असताना भंगाराच्या गोदामांचा प्रश्‍न मात्र जैसे थे आहे.

दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई करून हजारावर भंगाराची गोदामे व पत्राशेड जमीनदोस्त केली होती. तिथे पुन्हा गोदामे उभी राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी या परिसरातील सात ते आठ गोदामांना आग लागली होती. गॅस सिलिंडरचे स्फोट होत होते. त्यांच्या आवाजामुळे कानठळ्या बसत होत्या. आगीच्या धगीमुळे रात्रभर झोप नव्हती.

अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. याबाबत महापालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे स्थानिक रहिवासी दीपक जाधव व प्रकाश जुकंटवार यांनी सांगितले. या परिसरात अनेक कारखाने आहेत.

प्रदूषण वाढले आहे. त्याचा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, अशी तक्रार रस्टिक सोसायटीने केली आहे. तर आमच्या सोसायटीतील ८० टक्के लहान मुलांना व ज्येष्ठांना प्रदूषणामुळे श्‍वसनाचा त्रास होत आहे. एका गृहिणीला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते, अशी तक्रार अंजनी गाथा सोसायटीने केली आहे. प्रदूषण व आगीच्या घटनांना वैतागून अनेकांनी सदनिका विकायला काढल्या असून, त्याबाबत ‘फ्लॅट विकणे आहे,’ असे फलक या भागात लावले आहेत.

चिखली-मोशी पट्ट्यातील सदनिकांच्या खरेदी-विक्री व भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय करणारे इस्टेट एजंट कृष्णा कुडूक म्हणाले, ‘‘माझ्याकडे साधारणतः पाचशे सदनिकांची नोंद आहे. सदनिका विकायला येणाऱ्या नागरिकांकडून फिडबॅक फॉर्म भरून घेतले आहेत. त्यात वारंवार लागणाऱ्या आगी, कचऱ्याचे साम्राज्य आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र यामुळे फ्लॅट विकत असल्याचे सुमारे ८० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. प्रदूषण, कचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यामुळे या भागाचा विकास कसा होणार, अशी लोकांची भावना आहे.’

चिखली-मोशी परिसरातील भंगारमालाची गोदामे, लागणाऱ्या आग, जाळला जाणारा कचरा, कचऱ्याचे ढीग याबाबत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला गेल्या सात-आठ वर्षांपासून पत्रव्यवहार करून वेळोवेळी निवेदने देऊन कळविले आहे. परंतु अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. या भागात दोन पेट्रोल पंप झाले आहेत. त्यांनाही धोका आहे.
- विकास साने, अध्यक्ष, चिखली-मोशी हाउसिंग फेडरेशन  

Web Title: Scrab Godown Fire Jadhavwadi Chikhali