घरबसल्या मिळणार जमिनीची इत्थंभूत माहिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

हे बदल होणार 

  • सातबारा उताऱ्यावर आता जमिनीचा नकाशा, क्‍यूआर कोड रीडर 
  • क्‍यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरबसल्या मिळणार इत्थंभूत माहिती

पुणे : जमीन खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी सध्याच्या सातबारा उताऱ्यामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

जमिनीची पुनर्मोजणी प्रकल्पांतर्गत सातबारा उताऱ्यावर जमीन आणि मालकी हक्काच्या माहितीबरोबरच पीकपाण्याऐवजी जमिनीचा नकाशा व क्‍यूआर कोड रीडर देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील क्‍यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जागेची इत्थंभूत माहिती घरबसल्या मिळणार आहे. 

हा प्रयोग हरियाना राज्यात राबविण्यात आला असून, त्याच धर्तीवर सध्याच्या सातबारा उताऱ्यात बदल करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. सातबारा उताऱ्यावर आधार कार्ड क्रमांक देण्याची योजना यापूर्वीच हाती घेण्यात आली आहे. 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पुनर्मोजणी 
राज्य सरकारने जमिनीची पुनर्मोजणी प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या कामाची निविदा भूमी अभिलेख विभागाकडून काढण्यात आली आहे. लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

उताऱ्यावर क्‍यूआर कोड प्रिंट 
जमिनीची पुनर्मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही मोजणी करताना प्रत्येक सर्व्हेनंबरचे कोर्डीनेट निश्‍चित करून सातबारा उताऱ्यावर क्‍यूआर कोड प्रिंट करण्यात येणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर जमीनमालकाला त्याच्या जागेची संपूर्ण माहिती क्षणात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सध्याच्या सातबाऱ्यामध्ये बदल करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. 

जमिनीचा नकाशाही असणार 
सध्या सातबारा उताऱ्यावर केवळ जमिनींचा सर्व्हे अथवा गटनंबर, सदर जमीनधारकाची आणि पीकपाण्याची माहिती दिलेली असते. ही रचना बदलून पानाच्या वरील बाजूस जमिनीची आणि मालकाची माहिती, तर खालच्या बाजूस जमिनीचा नकाशा असणार आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनेकदा फसवणूक होते. जमीन एका ठिकाणची दाखविली जाते आणि प्रत्यक्षात विक्रीनंतर ती दुसऱ्या ठिकाणी असते, असे अनेक प्रकार होतात. अशा प्रकारांना आता आळा बसणार आहे. तसेच जमिनीची सर्व माहिती बसल्याजागी मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

    Web Title: Search 7/12 online is easy now