उरुळी कांचन ग्रामपंचायतीत गुप्त मतदान

grampanchayat
grampanchayat

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठरावाची मागणी पिसाळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार पिसाळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ७) विशेष मासिक सभा घेण्यात आली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या गुप्त मतदानात एकूण १७ सदस्यांपैकी १६ सदस्य हजर होते. पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर दोन सदस्यांनी कोरी मतपत्रिका टाकून मतदानापासून अलिप्त राहणे पसंत केले.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक २४ ऑगस्ट २०१५ रोजी झाली होती, यामध्ये ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना भविष्यात या पदावर काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते अशी चर्चा नाराज सदस्यांमध्ये होती. प्रत्यक्षात तसे न घडल्याने मागील वर्षभरापासून सर्व सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू होती. यातूनच संतोष हरिभाऊ कांचन यांच्या नेतृत्वाखाली एकूण १५ सदस्य एकत्र आले होते. त्यापैकी १३ सदस्यांनी सह्या करून सोमवारी (ता. २) सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता. सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, सदस्यांना तुच्छतेची वागणूक देणे, सरपंच पती राजेंद्र बबन कांचन यांची ग्रामपंचायत कारभारात होणारी व्यर्थ ढवळाढवळ व सरपंचाच्या परस्पर निर्णय घेणे या कारणांसाठी संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, सागर पोपट कांचन, जितेंद्र बाळासाहेब बडेकर, राजेंद्र शांताराम जगताप, रोहित सुधीर ननावरे, राजश्री जयंत वनारसे, सारिका विजय मुरकुटे, समता मिलिंद जगताप, सारिका किशोर लोणारी, कविता शरद खेडेकर, ज्योती सावकार पाथरकर या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

यावेळी उरुळी कांचनचे मंडलाधिकारी दिपक चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पिठासीन अधिकारी प्रशांत पिसाळ यांना सहकार्य केले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी पिसाळ म्हणाले,"अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंचाला येत्या सात दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. मात्र या  तरतुदीनुसार सदरचे सरपंच अपिलात गेले नाही तर पुढील ४० दिवसाच्या आत प्रशासनाला नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी घेणे क्रमप्राप्त आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com