पुणे : पुलगेट बसस्टॉपवर अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री

मोहिनी मोहिते
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सर्व परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच आढळून येत आहे. अनेक अल्पवयीन मुले, विद्यार्थी या व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याने येथील संबंधित प्रशासनाने विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी येथील अनेक सजग नागरिकांची मागणी आहे.

कॅंटोन्मेंट(पुणे) : पुणे कॅंटोन्मेंट हद्दीत असणाऱ्या पुलगेट म्हणजेच महात्मा गांधी बस स्थानकावर अनेक टपरीधारकांनी अतिक्रमण केले असून, यातील काही टपऱ्यांमध्ये चहाच्या नावाखाली छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच आढळून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक अल्पवयीन मुले, विद्यार्थी या व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याने येथील संबंधित प्रशासनाने विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी येथील अनेक सजग नागरिकांची मागणी आहे. गांधी बस स्थानकात सुमारे 20 ते 25 बेकायदेशीररीत्या टपऱ्या व दुकाने थाटलेली आहेत. यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे कॅंटोन्मेंट विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये स्नॅक्‍स सेंटर, चहा, मोबाईल दुरुस्ती, स्टेशनरी यासारख्या अनेक टपऱ्या आहेत. विद्यार्थी अडकतायेत व्यसनांच्या जाळयात विशेष म्हणजे या भागात कॅम्प एज्युकेशन, आझम कॅम्पस, पूना कॉलेज, सेंट मेरी हायस्कूल, सेंट व्हिन्सेंट, सेंट ऍन्स यांसारख्या अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. या वेळी शाळा व महाविद्यालय सुटताना व भरताना या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी असते. अनेक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी तासन्‌ तास या बस स्थानकावर बसची वाट पाहत बसलेले असतात.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

या वेळी अनेक विद्यार्थी टपरीवर घुटमळताना दिसतात. अनेक विद्यार्थी धूम्रपान, गुटखा व तंबाखूसारखे व्यसन करीत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करण्याचे हे स्थानक एक मुख्य कारण ठरत आहे. चहाच्या नावाखाली अमली पदार्थ विकले जात असल्यामुळे चहापेक्षा हा व्यवसाय जोरात असल्याचे दिसते. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दांडगाई, दहशत व अरेरावीपणामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे टपरीधारक कॅंटोन्मेंट बोर्डाला नव्हे, तर काही ठरावीक व्यक्तींना भाडे देत असल्याचे उजेडात आले आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आजतागायत कारवाई झालेली नाही. ही अतिक्रमणे चक्क पदपथावर असून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. अतिक्रमणधारकांना लोकप्रतिनिधींचे अभय कॅंटोन्मेंट बोर्डाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु, काही ठरावीक भागातील किरकोळ अतिक्रमणे काढून ही मोहीम थंडावली आहे. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांना अत्यावश्‍यक पोलिस बंदोबस्त मिळणे कठीण झाल्याने हे काम थांबवले आहे, असे सांगण्यात आले. अधिक चौकशी केली असता काही अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे मोहीम गुंडाळल्याची कॅंटोन्मेंट परिसरात चर्चा आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

वास्तविक, पुणे कॅंटोन्मेंटच्या प्रत्येक वॉर्डात अतिक्रमणे वाढली आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींचा आश्रय मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने महात्मा गांधी बस स्थानक अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. "या स्थानकावर मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या टपऱ्यांवर विकण्यात येणाऱ्या अमली पदार्थांमुळे विद्यार्थी व्यसनाधीन होऊन त्यांच्या आरोग्य व उज्ज्वल भविष्यावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे येथील बेकायदेशीर टपऱ्या त्वरित काढल्या पाहिजेत.'' - मोनीश म्हेत्रे, अध्यक्ष, मानवाधिकार "ही हद्द जरी कॅंटोन्मेंटची असली, तरी जागा ही पीएमपी प्रशासनाची आहे. या टपरीधारकांना आमच्याकडून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हा विषय आमच्याशी संबंधित नाही.'' - योगेश घाडगे, महसूल विभाग, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secret sale of narcotics at Pulgate Bus Stop pune