पुण्यात व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण करून लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला रिक्षात जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली. 

पुणे - व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण करून लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला रिक्षात जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेक्कन जिमखाना येथील शिरोळे रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण करून चोरट्यांनी त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. व्यावसायिकाकडून पैसे लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांना कात्रज परिसरात सोडून देत पसार झाले. 

याप्रकरणी अँथोनी सॅबस्टिन चवरू (वय ४६, रा. सोमाटणे, ता. वडगाव मावळ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अँथोनी यांची तनुश्री सिक्‍युरिटी अँड फॅसिलिटी नावाची खासगी संस्थांना सुरक्षारक्षक व अन्य सेवा पुरविणारी कंपनी आहे. बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर त्यांचे कार्यालय आहे. शनिवारी सायंकाळी ते वैयक्तिक कामानिमित्त शहरात आले होते. डेक्कन येथील आपटे रस्त्याजवळ असलेल्या शिरोळे रस्त्यावरून सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याच्या दिशेने जात होते. त्या वेळी रिक्षातून आलेल्या तिघांनी त्यांना धमकी देत जबरदस्तीने रिक्षात बसविले. रिक्षा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्यांच्याकडील पिशवीमध्ये असणारी अडीच लाख रुपयांची रक्कम, चष्मा, हातातील घड्याळ व मोबाईल असा ऐवज काढून घेतला. त्यानंतर त्यांना कात्रज येथील चौकामध्ये सोडून देत चोरट्यांनी पलायन केले. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करीत आहेत.

कोंढवा, शिवाजीनगरमध्येही लूट 
कात्रज-कोंढवा रस्त्यावर शुक्रवारी रात्री रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या बसंतलाल प्रजापती (रा. दगडेवस्ती, पिसोळी) या तरुणाला चोरट्यांनी लुटले होते. तत्पूर्वी, एका सराफी व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलिस वसाहतीसमोर व अन्य एका व्यक्तीला सिंहगड रस्ता परिसरात लुटले होते

मागील दोन महिन्यांतील घटना
    २६ नोव्हेंबर - कोरेगाव पार्क - मुंबईचे व्यापारी राजेश म्हात्रे यांना रिक्षातून नेऊन लुटले. थंडी, अतिमद्यसेवनामुळे मृत्यू. 
    १३ जानेवारी - पर्वती : टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकावर चाकूने वार करून लुटले
    १६ जानेवारी - शिवाजीनगर - सराफी व्यावसायिकाला शिवाजीनगर येथे लुटले, सहा लाखांचा ऐवज लंपास
    १६ जानेवारी - नऱ्हे : कार मागविण्याचा बहाण्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिकास दीड लाखाना लुटले
    १६ जानेवारी - आंबेगाव बुद्रुक - फोनवर बोलत थांबलेल्या कारचालकास धमकावून लुटले, ४७ हजारांचा ऐवज चोरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security of bussinessman in pune