सुरक्षारक्षकाची पत्नी झाली फौजदार

सुदाम बिडकर
शनिवार, 23 जून 2018

पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरील सुरक्षारक्षकाची पत्नी कल्पना सुनील राक्षे यांनी फौजदार होण्यात यश मिळविले आहे. 

त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, सहा वर्षांच्या मुलाचे संगोपन करत काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू ठेवला. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि २०१७ मध्ये पोलिस म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे नुकत्याच त्या एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन फौजदार झाल्या आहेत. 

तालुक्‍यातीलच खडकी येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुनील राक्षे भीमाशंकर कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नी कल्पना यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. घरातील महिला या नात्याने सर्व जबाबदारी तसेच मुलाचे संगोपन करत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने पोलिस दलात भरती होण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. पोलिस भरतीची महिलांची वयाची अट २५ वर्षे आहे. तयारी करत असतानाच २५ वर्षे पूर्ण झाले आणि त्यांच्या तयारीवर पाणी फिरले असे वाटत असतानाच सरकारने महिलांसाठी वयोमर्यादा २८ केली आणि त्यांच्या तयारीला नवी उमेद मिळाली. त्यांनी जोमात तयारी सुरू केली. २०१७ मध्ये मुंबई पोलिस दलात त्यांची निवड झाली. परंतु त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी निकालामध्ये त्या उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची फौजदारपदी निवड झाली आहे. त्यांच्या जिद्द व चिकाटीने समाजातील तरुणी तसेच विवाहित महिलांपुढेही एक आदर्श उभा राहिला आहे. पतीच्या प्रोत्साहनामुळे हे यश संपादन केल्याचे कल्पना राक्षे यांनी सांगितले. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते कल्पना राक्षे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कार्यालयीन अधीक्षक रामनाथ हिंगे उपस्थित होते.

Web Title: security guard wife PSI success motivation