आरोग्यरक्षकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न 

नंदकुमार सुतार 
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - जनतेच्या आरोग्याचे रक्षक असलेल्या वैद्यकीय व्यवसायातील मंडळींना स्वतःच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे संपूर्ण समाजासाठी चांगले लक्षण नाही. रोजच जीवन- मरणाच्या हिंदोळ्यावर असणाऱ्या या वर्गाला त्यांच्या जिवाची भीती वाटू लागली, तर निश्‍चितच संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, त्यामुळे या मुद्द्यावर आता केवळ वैद्यकविश्‍वातील धुरिणांनीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील जाणकारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. 

पुणे - जनतेच्या आरोग्याचे रक्षक असलेल्या वैद्यकीय व्यवसायातील मंडळींना स्वतःच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे संपूर्ण समाजासाठी चांगले लक्षण नाही. रोजच जीवन- मरणाच्या हिंदोळ्यावर असणाऱ्या या वर्गाला त्यांच्या जिवाची भीती वाटू लागली, तर निश्‍चितच संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, त्यामुळे या मुद्द्यावर आता केवळ वैद्यकविश्‍वातील धुरिणांनीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील जाणकारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनने गतवर्षी केलेल्या एका पाहणीनुसार देशात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी सुमारे 75 टक्के व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील हिंसक कृत्याचा सामना करावा लागला आहे. रुग्णालयाची इमारत आणि सुविधा हे हिंसक कारवायांचे पहिले लक्ष्य असते, त्यानंतर उपचार करणारे डॉक्‍टर आणि सहायक कर्मचारी यांचा क्रम लागतो, असेही पाहणीतून समोर आले आहे. सर्व स्तरांतील रुग्णांना सेवा देणाऱ्या शासकीय रुग्णालयांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. 

पुण्यातही अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रावरील हल्ले वाढले आहेत. ससून रुग्णालयात एका पोलिसानेही डॉक्‍टरला मारहाण करण्याच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्र अधिक सुन्न झाले असतानाच धुळ्याची ताजी घटना घडली, त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनातील भीतीच्या भावना जाहीरपणे व्यक्त होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे त्यांनी शहरात मोर्चा काढून आपल्या भावना समाज आणि राज्यकर्त्यांसमोर मांडल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांचा हा आजवरचा सर्वांत मोठा मोर्चा होता. झाडून साऱ्या संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. यानिमित्ताने हल्ल्यांच्या मुद्द्यावर डॉक्‍टरांची अभूतपूर्व एकजूट दिसून आली. त्यांनी व्यक्त केलेली चिंता खरोखरच सर्वांना विचारप्रवृत्त करणारी आहे. 

पुणे शहर नव्या विचारांचे आणि संकल्पनांचे केंद्र आहे. शिक्षण, कला-संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञानाचेही केंद्र आहे. त्याचप्रमाणे आयटी, ऑटोमोबाईलचे "हब' आहे. ते आधुनिक वैद्यकीय उपचारांचेही "हब' बनले आहे. त्यामुळे विदेशातून येथे येऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयपणे वाढली आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याचे वैद्यकीय उपचार क्षेत्र वेगाने बदलले आहे. नवनवे तंत्रज्ञान पुण्यात आधी येत आहे. स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. राज्यातील रुग्ण मोठ्या आजारांसाठी आता मुंबईला जाण्यापेक्षा पुण्याला पसंती देतात. त्याची कारणे उपचार सुविधांची गुणात्मक वाढ, मुंबईच्या तुलनेत डॉक्‍टरांच्या "अपॉईंटमेंट'ची सुलभता, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी कमी निवासी खर्च आदी असावीत. 

वैद्यकीय सेवा विस्ताराची प्रचंड क्षमता पुण्यामध्ये आहे, त्यामुळे येथील वातावरण चांगले ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. याचा प्रत्येक घटकाने विचार करायला हवा. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, वैद्यकीय व्यवसायातील डॉक्‍टर आणि न्याय व्यवस्थेतील न्यायाधीश ही पदे जनतेचा सर्वाधिक विश्‍वास असणारी आहेत. आरोग्य चांगले तर कार्यक्षमता चांगली आणि त्यामुळे त्याचे समाजातील योगदानही चांगले. या अर्थाने वैद्यकीय व्यवसाय हा तर प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षमतेशी संबंधित मानायला हरकत नसावी. या संदर्भातील कायदा होईल तेव्हा होईल. मात्र, त्यानंतरदेखील वैद्यकीय सेवा क्षेत्राचा आदर राखणे आणि त्यांची कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. 

"आयएमए'च्याच पाहणीनुसार वैद्यकीय सेवेचे "कार्पोरेटायझेशन' हे देखील वाढत्या हल्ल्यांमागील एक कारण आहे. या क्षेत्राचा विकास होताना "कार्पोरेटायझेशन' होणे अपरिहार्य असले, तरी त्यातील "माणूस' (रुग्ण) हरवू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील संवाद खुंटत चालल्याने त्यांच्यात वाढत चाललेली दरी हे देखील डॉक्‍टरांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचे कारण बनत चालले आहे. यासाठी वैद्यकीय सेवा क्षेत्रातील व्यक्तींनाही आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. इतरही काही कारणांमुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा काळवंडत चालली आहे. त्याचाही शोध घेऊन उपाययोजना कराव्या लागतील. सुरक्षेचा कायदा झाला म्हणजे हल्ल्यांवर अंकुश येईल हे खरे असले, तरी सर्व काही आलबेल होईल, असा अंदाज बांधणे भाबडेपणाचे ठरेल. संवाद वाढवणे हाच त्यामागील सिद्ध "उपचार' ठरू शकेल. यासाठी आता वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा. त्याचा आदर्श राष्ट्रासमोर निर्माण करण्याची क्षमता पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच आहे ! 

Web Title: Security guards from serious health problems