पुणे विद्यापीठातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनालयातील (रिफेक्‍टरी) खराब जेवण मिळत असल्याच्या कारणावरुन बेकायदा आंदोलन करणाऱ्या आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी भुरसिंह राजपुत (वय 55, रा. विनायकनगर, नवी सांगवी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पाच विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजपुत हे सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये सुरक्षा विभागाचे प्रमुख आहेत. फिर्यादी व त्यांच्या महाराष्ट्र सिक्‍युरीटी फोर्सचे कर्मचारी सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता विद्यापीठामध्ये सुरक्षेची जबाबदारी पार पाडत होते. त्यावेळी विद्यापीठातील रिफेक्‍टरीमध्ये फिर्यादी हे ओळखत असलेले काही विद्यार्थी विद्यापीठ रिफेक्‍टरीमध्ये एकत्र आले.

त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही पुर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी भोजनालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधीत पाच विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचारी केंचप्पा खांडेकर, किरण माने, अशोक परभणे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटास जखम झाली. महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याबरोबरच संबंधित विद्यार्थ्यांनी भोजनालयाचा दरवाजा तोडून खिडक्‍यांच्या काचाही फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 

Web Title: Security officers of Pune University have filed a complaint against the students