जप्तीची शेकडो वाहने आरटीओत पडून

श्रावण जाधव
शुक्रवार, 18 मे 2018

मोशी - वाहनांचा परवाना नसणे, कर भरलेला नसणे, कागदपत्रे नसणे, वाहनामध्ये अतिरिक्त बोजा असणे आदी कारणांमुळे जप्त केलेली शेकडो वाहने सध्या प्राधिकरणातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या जागेमध्ये पडून आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांची विल्हेवाट न लावल्यास या वाहनांमध्ये पाणी साचून डास होणे, या वाहनांचे सुटे भाग चोरीस जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

मोशी प्राधिकरणातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे उच्चभ्रू नागरी वसाहतीमध्ये आहे. येथील नागरिक दररोज सकाळ-संध्याकाळी कार्यालयासमोरील रस्त्यावरून वॉकिंग करतात. मात्र, या रस्त्यालगत हे कार्यालय झाल्यापासून तपासणीसाठी आलेल्या वाहनचालकांकडून गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे, ऑइल गळती, रस्त्यावर कचरा, अनधिकृत हातगाड्या, आडव्यातिडव्या स्वरूपातील पार्किंग आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी जप्त केलेली शेकडो वाहने ठेवण्यात आली आहेत. आगामी पावसाळ्यात या वाहनांच्या उघड्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची निर्मिती होण्याची शक्‍यता आहे. त्यातून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती आहे. त्यातच या वाहनांचे सुटे भागही चोरीस जात आहेत. या समस्यांची संबंधितांनी योग्य वेळी दखल घेऊन त्याचे निवारण करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

माझ्यासारखे अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. कार्यालय सुरू झाल्यापासून या रस्त्यावर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचे त्वरित निवारण करणे आवश्‍यक आहे. 
- राजेश साळवी, स्थानिक निवासी
    
कर न भरणे, परवाना नसणे आदी कारणांमुळे ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. ज्या कारणांनी ही वाहने जप्त केली जातात, त्यांची पूर्तता केल्यास ही वाहने सोडली जातात. सोडवून न नेलेल्या वाहनांची लवकरच भंगारामध्ये विक्री केली जाणार आहे. 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर

Web Title: seized vehicle RTO Office