मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन

राजकुमार शहा 
शुक्रवार, 29 जून 2018

जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील दोन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन त्यांना मारहाण करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथे विवाह सोहळ्यावेळी नवरदेव व त्याची आई पारण्याला मंदिरात का गेली, यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली.

मोहोळ : राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून दलित महासंघाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील अवघडे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. राज्यात मातंग समाजावर सध्या विविध प्रकारे अन्याय होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील दोन मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन त्यांना मारहाण करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथे विवाह सोहळ्यावेळी नवरदेव व त्याची आई पारण्याला मंदिरात का गेली, यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली. केम येथील मातंग समाज कसत असलेल्या जमिनीवर पारधी समाजातील काही जणांनी बळजबरीने कब्जा केला. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

आंदोलनात सोमनाथ कसबे सारंग शिंदे, किसन जाधव, गोवर्धन घोलप, अनिल घोलप, राहुल खंदारे, बालाजी कसबे, महादेव खंदारे, वैजीनाथ नेटके, अक्षय खंदारे, बापू घोलप आदी सहभागी झाले होते.
 

Web Title: Semi Nude movement in the premises of Mohol Tehsil office