'पर्यावरण समस्यांचा सातत्याने पाठपुरावा हवा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - उग्र रूप धारण केलेल्या पर्यावरणाच्या समस्या एकेकट्याने लढून सुटणार नाहीत, तर त्यासाठी प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ, राजकीय नेतृत्व आणि माध्यमांनी एकाच दिशेने सातत्याने पाठपुरावा करणे ही काळाची गरज असल्याचा सूर मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित परिसंवादातून निघाला. 

पुणे - उग्र रूप धारण केलेल्या पर्यावरणाच्या समस्या एकेकट्याने लढून सुटणार नाहीत, तर त्यासाठी प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ, राजकीय नेतृत्व आणि माध्यमांनी एकाच दिशेने सातत्याने पाठपुरावा करणे ही काळाची गरज असल्याचा सूर मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित परिसंवादातून निघाला. 

"भवताल' आणि "सोसायटी फॉर सायन्स एनव्हायर्न्मेंट अँण्ड पीपल' (सेप) यांच्यातर्फे पर्यावरण दिनानिमित्त "या पर्यावरणाचं करायचं काय?' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, "पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन'चे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, सदा डुंबरे आणि "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यात सहभागी झाले होते. "भवताल'चे अभिजित घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. 

सुळे म्हणाल्या, ""पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. स्वयंसेवी संस्था आणि वर्तमानपत्रांमधून पर्यावरणाबाबत सातत्याने प्रश्‍न मांडले जातात. पण, त्या सोडविण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्‍यकता असते. सरकारचे काम सरकार करत असते; पण आपण समाज म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.'' 

स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरणाच्या प्रश्‍नांची उकल करत असतानाच स्थानिक पातळीवर समस्यांवर लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

डॉ. करमळकर म्हणाले, ""विद्यापीठात इमारत बांधताना काही झाडे तोडली जातात. त्यात वड, पिंपळ असे मोठे वृक्ष तोडले जात नाहीत. गाव आणि शहरांचा विकास करताना नियोजन करण्यात आपण कमी पडतो. त्यात भविष्यातील वेध घेतला जात नाही. त्यातून वस्तुस्थितीत तफावत निर्माण होऊन पर्यावरण्याच्या समस्या निर्माण होतात.'' 

फडणीस म्हणाले, ""माध्यमांनी केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावरचे उपाय सुचविले पाहिजेत. जनजागृती, लोकसहभाग आणि धोरणात्मक निर्णय यातून पर्यावरणविषयक समस्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.'' 

अभिजित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र हुंजाळ यांनी आभार मानले. 

Web Title: Seminar organized on the occasion of Environment Day