वृद्धत्वाच्या सन्मानासाठी होऊया सजग

योगिराज प्रभुणे - @yogirajprabhune
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

देशात २०५० मध्ये ३० कोटी लोकांनी वयाची साठी ओलांडलेली असेल. त्या वेळी वृद्धत्व ही एक मोठी सामाजिक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. त्याची तयारी आतापासूनच करण्याची गरज आहे. या विषयातील देशातील ‘रिजनल रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर’ पुण्यात विकसित केले आहे.
- डॉ. विनोद शहा, अध्यक्ष, जनसेवा फाउंडेशन

देशात पुढील १४ वर्षांत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय वाढणार आहे. भविष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक समस्यांचे आव्हान पेलण्यासाठी आतापासून तयारी करणे आवश्‍यक आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने बॅंकॉक येथे नुकतेच ‘वृद्धत्व आणि आरोग्य’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. ज्येष्ठांचे चांगले आरोग्य आणि चांगली काळजी घेऊन त्यांना सन्मानाने जगता यावे, हाच या चर्चासत्राचा उद्देश होता.
 

भारत हा सध्या जगात सर्वांत तरुण देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. आजचा ४५ वर्षांचा माणूस चौदा वर्षांनी वयाच्या साठीकडे झुकलेला असेल. अशा लोकांची संख्या देशभरात १६ कोटींच्या आसपास असणार आहे. त्यामुळे भविष्यात उद्‌भवणाऱ्या या सामाजिक संकटातून मार्ग काढण्याचे उपाय लवकरच शोधले पाहिजेत. त्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने २६ ते २८ ऑक्‍टोंबरदरम्यान तीन दिवसीय चर्चासत्र घेतले. 
आशियातील भारतासह इंडोनेशिया, मालदिव, तिमारेतस्ते, नेपाळ, बांगलादेश, मॅनमार, श्रीलंका, भूतान आदी अकरा देशांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग घेतला होता. पुण्यातील जनसेवा 
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा हे भारतातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून यात सहभागी झाले होते.
 

अशी वाढतेय समस्या...
आरोग्याच्या चांगल्या सुविधांमुळे सरासरी आयुर्मर्यादा वाढत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत वाढलेल्या १६ कोटींमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय झालेल्यांचे प्रमाण १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल. या नागरिकांना स्मृतीभ्रंश, अल्झायमर या आजारांचा धोका असतोच; पण त्याही पेक्षा एकटेपणा ही त्यातील सर्वाधिक डोकेदुखी असते. त्यातून हे ज्येष्ठ नागरिक नैराश्‍यामध्ये जाण्याची शक्‍यता असते. त्यांना वयोमानानुसार होणारे हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, अर्धांगवायू किंवा मेंदूविकार होत असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्याची समस्या वाढत आहे.

केअर गिव्हर्स कोर्स
वाढते वय ही दीर्घकालीन समस्या आहे. त्यावर कायम स्वरूपी उपाय शोधला पाहिजे. त्यासाठी ‘केअर गिव्हर्स कोर्स’ सुरू केल्याची माहिती डॉ. शहा यांनी दिली. दहावी पास ही या कोर्सची पात्रता आहे; पण या सेवेसाठी पुढे येणाऱ्या तरुणांचे प्रमाण खूप कमी आहे. ही भविष्यातील गरज असूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही. हा कोर्स वेगवेगळ्या संस्थांनी सुरू करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांची काळजी खऱ्याअर्थी त्यांच्या घरातील लोकांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांचे हक्क
सरकारी आस्थापनांमध्ये स्वतंत्र व्यवस्था
उद्याने
विरंगुळा केंद्रे
वृद्ध मैत्री शहरे
वृद्धांची दीर्घकालीन सेवा केंद्र

लहान मुलांमध्ये जागृती
आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांबद्दल आत्मियता असणे आवश्‍यक आहे; पण आताच्या तरुण पिढीमध्ये ही आत्मियता नाही. ज्येष्ठांना वृद्धाश्रमात पाठविण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे लहान वयातच या प्रश्‍नाबाबत जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेत जाणाऱ्या त्यांच्या नातवंडांमध्ये ही जाण निर्माण करण्यात येत आहे. ‘माझे आजी-आजोबा माझ्याच घरी राहतील,’ असा प्रयत्न नातवंडांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

पुरुषांपेक्षा स्त्रिया दीर्घायुषी
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक दीर्घायुषी होत असल्याचे चित्र सध्या देशभरात दिसत आहे. त्यामुळे भविष्यात बहुतांश घरांमधून ज्येष्ठ महिलांचे आजारपण, त्यांची मानसिकता कशी जपायची, असा प्रश्‍न निर्माण होईल. ताणतणाव आणि निवृत्तीनंतर पुरुषांची हालचाल कमी होते. त्याविरुद्ध स्त्रियांचे आयुष्यभर काम सुरू असते. त्यामुळे महिला दीर्घायुषी होतात. त्यामुळे वृद्धत्व हे ‘ॲक्‍टिव्ह’ असावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतरही वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहणे आवश्‍यक आहे.

२०३० पर्यंतचे नियोजन
जागतिक आरोग्य संघटनेने वृद्धत्व या भविष्यातील संकटावर उपाय शोधण्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सूचनांचे संकलन करण्यात येत आहे. त्यामध्ये २०१७ ते २२ आणि २०३० या दोन टप्प्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांवर नेमके उत्तर शोधले जाणार आहे.

Web Title: senility of honor and change alert