#Livein या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी...

#Livein या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी...

पुणे - उतारवयात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आधाराकरिता हक्काचा माणूस मिळवून देण्यासाठी आता संस्था, समूह गट उदयाला येऊ लागले आहेत. त्यातून एका संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत ६० ते ७५ वर्षे वयोगटातील ३२ ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत. अर्थात, त्यासाठी सर्व प्रकारची खबरदारीही आता बाळगली जाऊ लागली आहे. 

मुलांचे परदेशात स्थायिक होणे, जोडीदाराचा मृत्यू यांमुळे येणाऱ्या एकाकीपणाला अनेक ज्येष्ठांना सामोरे जावे लागते. त्यातूनच अलीकडच्या काळात युवकांच्या धर्तीवर ज्येष्ठांमध्येही ‘लिव्ह इन’चे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अनुरूप जोडीदार मिळणे, ही समस्या त्यातून निर्माण झाली आहे. आता त्यासाठीही काही संस्था, समूह गट निर्माण होऊ लागले आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सहली आयोजित करण्याचा उपक्रम राबविला जातो. त्यातून ओळख होऊन, खातरजमा करून ‘जोड्या’ जुळविल्या जातात. 

शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उतारवयात होणारे शारीरिक त्रास व परावलंबित्व यांवर मात करण्यासाठी केवळ आर्थिक सुबत्ता पुरेशी नसून हक्काचा माणूस जवळ असावा, अशी भावना त्यांच्यात वाढत आहे. त्यासाठी वधू-वर सूचक संस्थांच्या धर्तीवर ज्येष्ठांसाठीही संस्था निर्माण होऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ पुरुष नागरिकांकडून पाच हजार, तर महिलांकडून दोन हजार रुपये आकारून त्यांना सदस्यत्व दिले जाते. त्यांच्या अपेक्षा नोंदवून घेतल्या जातात. तसेच कौटुंबिक, सामाजिक पार्श्‍वभूमीचीही दखल घेतली जाते. वेळप्रसंगी संबंधित संस्था त्याची खातरजमाही करतात. अनुरूप वाटल्यास जोडीदार सुचविले जातात. खासगी किंवा शासकीय नोकरीमधून निवृत्त झालेल्यांची संख्या त्यात जास्त आहे. लग्नाचा जोडीदार असेल आणि तरीही साथीदार हवा असेल, तर सदस्यत्व दिले जात नाही. तसेच जोडीदार निश्‍चित झाल्यावर उभयांतांमध्ये करार केला जातो. त्यात आर्थिक बाबींचा समावेश असतो. त्या कराराची नोंदणीही केली जाते. 

एकमेकांची काळजी घेण्यापासून ते भावनिक, मानसिक आधार देण्यासाठी लिव्ह इन उपयुक्त ठरत आहे, असे या क्षेत्रातील निरीक्षकांचे निरीक्षण आहे. काही उदाहरणांमध्ये तर नातेवाईक, मुले- मुली यांच्या सहमतीने विवाह सोहळेही होत आहेत. यासाठीच्या संस्था आता केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी शहरांतही निर्माण होऊ लागल्या आहेत. 

 मांसाहार करणे कटाक्षाने टाळत असे. मी नेहमी म्हणायचे माझ्या नवऱ्याने मांसाहार केलेला चालणार नाही, पण लिव्ह इनमुळे आता मात्र एकमेकांच्या आवडीनिवडींशी जुळवून घेणे जमू लागले आहे.
एक ६५ वर्षीय महिला 

लिव्ह इन म्हणजे आमच्यासाठी फ्रेंड्‌स इन रिलेशनशिप आहे. पत्नी गेल्यामुळे नवे नाते निर्माण करावे लागले. त्यातून परस्परांची काळजी घेणारी सोबत मिळाली आहे. 
एक ७० वर्षांचे नागरिक 

ज्येष्ठांच्या लिव्ह इन रिलेशनशिपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. त्यात शारीरिक गरजेपेक्षा भावनिक गरज आणि परस्परांची काळजी घेणे, हा मुख्य उद्देश आहे. उतारवयातील आजार, व्याधी यांना सामोरे जाण्यासाठी सहकारी गरजेचा असतो. त्यातून मिळणारी सोबत अखेरपर्यंत महत्त्वाची ठरते.
- माधव दामले, संचालक, ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com