#SeniorCitizen थरथरत्या हातांतही तंत्रज्ञानाच्या जादूची कांडी

प्रियांका तुपे
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे - चार दिवसांपूर्वी उजवा मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे मदतकार्य करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वर्षा गुप्ते (वय 74) या आजींना मोठी मदत झाली ती मोबाईलची. व्हॉट्‌सअपवरून मदतकार्याबाबतचे नियोजन सहकाऱ्यांशी शेअर करणे, तेथील परिस्थितीचे फोटो, व्हिडिओद्वारे इतर लोकांना कळवणे, फेसबुकवरून मदतीसाठी आवाहन करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या.

अविनाश कुलकर्णी (वय 76) हे आजोबाही फेसबुकवर सक्रिय आहेत. विविध व्हिडिओ शेअर करणे, राजकीय - सामाजिक विषयांवर आपली मते मांडणे, इतरांच्या चांगल्या पोस्टस शेअर करणे हे त्यांना आवडते. फेसबुकवर चांगले लेखन करणाऱ्या तरुणांना ते आवर्जून फॉलो करतात.
गुप्ते आजी आणि कुलकर्णी आजोबांप्रमाणेच सध्या अनेक आजी - आजोबा तंत्रज्ञानाची नवी ओळख करून घ्यायला उत्सुक आहेत, नव्या गोष्टी शिकत आहेत. ऑनलाइन ऑर्डर करून जेवण मागवणे, सिनेमाची तिकिटं बुक करणे, परदेशातील नातेवाइकांना व्हिडिओ कॉल करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर गप्पा मारणे अशा अनेक गोष्टी हे आजी - आजोबा करत असतात.

ज्येष्ठ नागरिकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिकवण्यासाठी खास कार्यशाळा घेणाऱ्या समीर दिघे आणि शाल्मली रेडकर यांनी याबाबत सांगितले, की आपल्याला वाटते, जुनी पिढी नवे तंत्रज्ञान शिकू पाहत नाही, त्यांना हे जमत नाही. मात्र आम्ही आयोजित केलेल्या कार्यशाळांना मिळालेला प्रतिसाद पाहता आजी - आजोबा हे नवं जग समजून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहेत, असे दिसते. तरुण पिढीने थोडा संयम बाळगून ज्येष्ठ नागरिकांना या बाबी शिकवणे गरजेचे आहे.''

वर्षा गुप्ते (सामाजिक कार्यकर्त्या) - गेल्या अनेक वर्षांपासून मी या तंत्रज्ञानाशी गट्टी करायला सुरवात केली. सोशल मीडियाची मला माझ्या सामाजिक कामात खूप मदत होते. आणखी अनेक गोष्टी शिकण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.

अविनाश कुलकर्णी (सेवानिवृत्त) - मी ऑर्कुटसारख्या सामाजिक माध्यमांवरही सुरवातीपासून सक्रिय होतो. मग फेसबुक आलं. व्हॉट्‌सअपही वापरतो. व्हिडिओ कॉल करून परदेशातील नातवंडांशी गप्पा मारतो. हळूहळू आणखी नवीन गोष्टी, गेम्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

मारुती मोरे (वय 61, रिक्षाचालक) - मी फेसबुक आणि व्हॉट्‌सअपचा जास्त वापर करतो. माझ्या विवाहित मुलींशी संपर्कात राहण्यासाठी, फोटो, व्हिडिओ शेअर करण्यासाठी मला व्हॉट्‌सअप जास्त सोयीचे वाटते. फेसबुकवरही माझे अकाउंट आहे. शिवाय यू -ट्यूबवर व्हिडिओ पाहणे, मी सध्या शिकत आहे.

कपिल खरे - माझे वडील सुनील खरे 68 वर्षांचे आहेत, तर आई मधुराचं वय 62 आहे. काही दिवसांपूर्वीच मी दोघांनाही नवीन स्मार्टफोन घेऊन दिले आहेत. सध्या वेळ मिळेल तसं मी आणि माझी बहीण आई - बाबांना व्हॉट्‌सअप, व्हिडिओ कॉल्स करणे हे शिकवत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizen Old People Day Special