जुनी सांगवीत सत्तर जेष्ठांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा 

रमेश मोरे
रविवार, 1 जुलै 2018

शाळेत गेल्यावरच गुरूजींसमोर उभे करून मोजलेली उंची व कानाला डोक्यावरून हाताची बोटे शिवली की शाळा प्रवेशाचं वय ठरायचं.याच कारणामुळे आज साठी सत्तरी गाठलेल्या बहुतांश जेष्ठ मंडळीच्या जन्मतारखा शाळा प्रवेश महिन्याच्या म्हणजे जुन महिन्यातील होय. सध्या जन्म मृत्युची नोंद अनिवार्य केली आहे.

जुनी सांगवी : पन्नास ते साठ वर्षांपुर्वी सर्वसामान्य कुटुंबात जन्मदिन तिथी वार तारीख लिहिण्याचे विशेष महत्व नव्हते.तर या बाबीकडे त्यावेळी विशेष गांभीर्याने घेतले जात नसायचे. अशिक्षितपणामुळे कष्टकरी समाज, मध्यमवर्गीय समाजात तर ख-या जन्म तारखेची वानवाच म्हणावी लागेल. अशा जन्म तारखेच्या घोळात सध्याची एक जेष्ठ पिढीच वंचित राहिली असल्यास नवल नसावे.

शाळेत गेल्यावरच गुरूजींसमोर उभे करून मोजलेली उंची व कानाला डोक्यावरून हाताची बोटे शिवली की शाळा प्रवेशाचं वय ठरायचं.याच कारणामुळे आज साठी सत्तरी गाठलेल्या बहुतांश जेष्ठ मंडळीच्या जन्मतारखा शाळा प्रवेश महिन्याच्या म्हणजे जुन महिन्यातील होय. सध्या जन्म मृत्युची नोंद अनिवार्य केली आहे. तशी ती साठवर्षापुर्वीही होती. मात्र समाजाने ती अंगीकारली नव्हती. अशाच जुन महिन्यातील ख-या खोट्या जन्मतारखा असलेल्या मात्र त्या कागदोपत्री जिवनाला चिकटवुन जिवन व्यतीत करणा-या सत्तर जेष्ठ नागरीकांचा जुनी सांगवी येथे सामुहिक वाढदिवस साजरा करण्यात आला.

येथील यश जेष्ठ नागरीक संघाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सांगवीकरांनी उत्सफुर्त सहभाग घेत दाद दिली.  जेष्ठ नागरीकांच्या हस्ते येथील एस.टी. मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. तर प्रत्येकाने एक झाड दारी लावुन त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. यावेळी स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे,हर्षल ढोरे,माई ढोरे,शारदा सोनवणे,सिनेट सदस्य संतोष ढोरे,तृप्ती कांबळे,घनशाम कांबळे,तुकाराम भुमकर यांनी उपस्थित होते. फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन,व नगरसेवक संतोष कांबळे यांच्या सहकार्याने फटाक्यांच्या आतषबाजीत सत्तर जेष्ठ नागरीकांच्या हातुन केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. तर सत्तर जणांना  फेटा,शाल श्रीफळ देवुन अभिष्टचिंतन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  साहेबराव कांबळे यांनी केले. साठी सत्तरीत होणा-या वाढदिवसाने जेष्ठमंडळी भारावुन गेली होती. यावेळी एकत्र कुटुंबाला मुकलेल्या अनेकांनी मनोगतातुन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.विभक्त कुटुंबाची वाढती क्रेझ व जेष्ठांची त्यात होणारी परवड, माया प्रेमापासुन वंचित राहिलेली नातवंडं आणी दुरावत चाललेली नाती त्यातुन होणारी परिवाराची घुसमट या भावना  जेष्ठांनी व्यक्त केल्या. नात्यातील अंतराची दरी कमी करून एकत्र कुटुंबपद्धतीचा संस्कार पुढच्या पिढीवर रूजवावा असे आवाहन जेष्ठांनी मनोगतातुन व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल सुतार यांनी केले. तर आभार बाळासाहेब सोनवणे यांनी मानले. 

Web Title: senior citizens birthday celebration