''मराठी भाषेच्या चिंधड्या पाहवत नाही''  : सई परांजपे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या युद्धात ते नांगी का टाकतात?,'' असा प्रश्‍न उपस्थित करीत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी संकटात सापडलेल्या मराठी भाषेविषयीचे शल्य बोलून दाखविले. 

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना "गदिमा पुरस्कार' देण्यात आला. या वेळी भारती मंगेशकर यांना "गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना "चैत्रबन पुरस्कार', गायिका केतकी माटेगावकर हिला "विद्या प्रज्ञा पुरस्कार' देण्यात आला. नांदेड येथील आकांक्षा सूर्यवंशी हिला "गदिमा पारितोषिक' देण्यात आले. कार्यक्रमात विनया बापट अनुवादित "सिलेक्‍टेड शॉर्ट स्टोरीज ऑफ जी. डी. माडगूळकर' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

पुरस्काराला उत्तर देताना परांजपे यांनी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिलाच; परंतु मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी वक्तव्य केले. ""इंग्रजी भाषेबद्दल राग किंवा तिरस्कार अजिबात नाही. ही भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे. परंतु, ही भाषा स्वतंत्रपणे शिका, तिच्यात सरमिसळ करू नका, असेही त्यांनी सांगितले. माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात "प्रतिभा संगम' हा गीतांचा कार्यक्रम झाला. 

आकाशवाणीमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून काम करताना गीत-रामायणाच्या तालीम चोरून पाहत असे. गदिमांसारख्या उंच प्रतिभेच्या व्यक्तीसमोर जाण्याची भीती वाटायची. म्हणून त्यांचा आशीर्वाद तेव्हा मिळू शकला नाही. मात्र, गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात मिळालेल्या पुरस्काराने त्यांचा आशीर्वाद मिळाल्याचे समाधान आहे. 
- सई परांजपे 

"गदिमा हे गाण्यापुरते मर्यादित नाहीत, त्यांचे गद्य लेखन त्या जोडीला आहे. मराठी वाङ्‌मयात त्यांचा अनिर्बंध वावर दिसतो. समग्र गदिमा समजून घेण्यासाठी त्यांच्या संपूर्ण साहित्याकडे वळले पाहिजे. मराठी भाषेची सुंदर, प्रभावी जाणीव गदिमांच्या साहित्यातून होईल. त्यातून आपलीच अभिरुची अधिकाधिक समृद्ध होणार आहे.'' 
- डॉ. अरुणा ढेरे, नवनिर्वाचित अध्यक्ष, 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

Web Title: Senior Director Sai Paranjpe received "Gadima Award"