ज्येष्ठ ‘निराधार’!

स्वप्नील जोगी
रविवार, 23 एप्रिल 2017

‘बायोमेट्रिक’च्या समस्येमुळे आधार कार्डला नकार

‘बायोमेट्रिक’च्या समस्येमुळे आधार कार्डला नकार

‘मध्यंतरी मी लाइफ सर्टिफिकेटसाठी बॅंकेत गेलेलो असताना माझ्याकडे आधार कार्डाची विचारणा करण्यात आली. माझं आधार आधीच माझ्या बॅंक खात्याशी जोडलेलं होतं, पण या वेळी माझ्या बोटांचे ठसे पुन्हा एकदा मागितले गेले. मी ठसे दिले, पण ते अस्पष्ट आले. माझ्या आधार नोंदणीच्या वेळी दिलेल्या मूळ ठशांशी ते जुळू शकले नाहीत. शेवटी मला बॅंकेतून ‘माझे ठसे अपडेट करून घेण्यास’ सांगण्यात आलं... आधार केंद्रावर गेल्यावरही ठसे स्पष्टपणे स्कॅन झाले नाहीत आणि अचानक एका महिन्याने मला कळलं, की माझं आधार कार्डच नाकारलं गेलंय, मला नवीन आधार कार्ड काढावं लागेल... मला सांगा, या वयात मी ठिकठिकाणच्या खेटा किती वेळा मारायच्या? माझेच हक्काचे पैसे अन्‌ सुविधा मिळवायला मी किती हेलपाटे घालायचे?’

वय वर्षं ८० असणाऱ्या कोथरूड येथील कृष्णराव संकपाळ यांची त्यांच्याच शब्दांत मांडलेली ही कैफियत आहे. अर्थात, ही कैफियत केवळ प्रातिनिधिक अशीच म्हणता येईल, कारण शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना संकपाळ यांच्याप्रमाणेच ‘आधार’ समस्येला पावलोपावली सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, हे वास्तव जणू आपल्या गावचेच नसल्याच्या थाटात अजूनही कुठल्या सरकारी कार्यालयाने या वाढत चाललेल्या समस्येची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.

काय आहे समस्या?
वाढत्या वयापरत्वे शरीरात वृद्धापकाळी जे बदल होत जातात, त्याचाच एक भाग म्हणजे हातांच्या बोटांवरील रेषांचे ठसे अस्पष्ट होत जाणे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत तर हे लक्षण अगदीच सर्वसामान्य आहे. मात्र तेच त्यांच्यासाठी आता डोकेदुखी ठरत आहे. याला कारण आहे सरकारने नागरिकांना त्यांच्या विविध खात्यांसाठी केलेली आधारजोडणीची सक्ती!

आधार कार्ड काढण्यासाठी सुमारे ८ वर्षांपूर्वी नोंदणी केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे आता बदलले आहेत. त्यामुळे ते त्या वेळच्या प्रतिमांशी (स्कॅन इमेज) जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय, नव्याने स्कॅन केलेले ठसे संगणकात अस्पष्ट दिसतात. हे ठसे मूळ ठशांशी जुळले नाहीत, की संगणकाकडून आधार कार्ड नाकारले जात आहे. त्यामुळे अनेक जण विविध सरकारी सुविधांसह बॅंक खात्याच्या व्यवहारांपासूनही वंचित राहण्याची समस्या उद्‌भवली आहे. गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारले जाण्यापासून प्राप्तिकर परतावा भरण्यात येणाऱ्या अनेक समस्या सध्या नागरिकांपुढे उभ्या राहत आहेत.

अर्थात, ही समस्या एवढ्यावरच थांबणारी नाही. एकीकडे, बोटांचे ठसे न जुळल्यामुळे आधार नाकारले जाण्याचे (रिजेक्‍ट) प्रमाण वाढते असतानाच दुसरीकडे नव्या आधार नोंदणीसाठी तीन तीन महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट’ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आधार नाकारले गेल्यामुळे ‘निराधार’ झालेल्या नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

बुबुळांच्या प्रतिमा जुळवणारी यंत्रे हवीत
आधारची नोंदणी करताना दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे; तसेच बुबुळांच्या प्रतिमाही घेतल्या जातात. मात्र, बॅंका आणि सरकारी कामकाजामध्ये बुबुळांवरून ओळख पटविण्याची सुविधा नाही. तशी सुविधा उपलब्ध झाल्यास हा प्रश्‍न काही प्रमाणात सुटू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्या नागरिकांना समस्या असतील, त्यांनी त्याची लेखी तक्रार दाखल करावी. आम्ही दखल घेऊ. बायोमेट्रिक पुरावे हे सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ठरतात. मात्र ज्येष्ठ नागरिकांना अडचणी येत असतील, तर लेखी तक्रारीनंतर त्यावर उपाय शोधण्यात येईल. सध्या मात्र यासंदर्भात पर्यायी उपायांची तरतूद नाही.
- समीक्षा चंद्राकार, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी

जैवमापन (बायोमेट्रिक) आधारावर घेतलेले पुरावे उपयोगाचे नाहीत, कारण बोटांचे ठसे काय किंवा बुबुळे काय; वाढत्या वयोपरत्वे त्यांत नैसर्गिक बदल होतच जातात. त्यामुळे ते काही कालावधीनंतर मूळ प्रतिमांशी जुळणे अशक्‍यच आहे. आधार जोडणीची ही चुकीची पद्धत बंदच करायला हवी; अन्यथा ज्येष्ठच नव्हे तर सर्वच नागरिकांना ही समस्या कधीतरी त्रास देणार आहे. त्यांच्या हक्कांवर गदा आणणार आहे.
- अनुपम सराफ, गव्हर्नन्सचे तज्ज्ञ

Web Title: senior people baseless