ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली

पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

शरद साठे यांनी १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेत संगीत शिकण्यास सुरुवात केली. पलुसकरांबरोबर अनेक संगीत कार्यक्रमांत भाग घेण्याच्या संधीसोबत त्यांना आपल्या गुरूंसमवेत भरपूर प्रवास करायला मिळाला.
पलुसकरांचे १९५५ मध्ये अकाली निधन झाले. शरद साठ्यांनी तेव्हा गुरूच्या शोधात १९५६ मध्ये मुंबई गाठली व संगीतज्ञ प्राध्यापक बी. आर. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दहा वर्षे संगीत साधना केली. त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. १९६१ मध्ये शरद साठे गंधर्व महाविद्यालय मंडळातून संगीत विशारद झाले. प्राध्यापक देवधरांकडून त्यांना अनेक अप्रचलित रागांमधील विविध रचना शिकायला मिळाल्या.
 

साठे यांनी १९६६ नंतर ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. शरदचंद्र अरोलकर यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडे साठ्यांना ग्वाल्हेर घराण्यातील अनेक दुर्मिळ ख्याल रचना, टप्पे व तराण्यांचे ज्ञान मिळाले. पं. शरद साठे हे आकाशवाणीवर तसेच दूरचित्र वाहिन्यांवर नियमित स्वरूपात गायन कार्यक्रम करतात. आजवर त्यांनी कित्येक संगीत परिषदा व संगीतोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. १९७२ मध्ये फिल्म्स डिव्हिजन ने पं. विष्णू दिगंबर पलुसकरांवर काढलेल्या माहितीपटासाठी गाण्याचा विशेष सन्मान त्यांना लाभला. २००६ मध्ये आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीने त्यांचा हिंदुस्तानी गायन संगीताच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला.  २००९ मध्ये त्यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृति गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे उच्च श्रेणी कलावंत. संगीत रत्न, काशी संगीत समाज हे पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

Web Title: Senior singer Pandit Sharad Sathe passed away