#SeniorCitizen बॅंक दाद देईना; पोलिस तक्रार घेईना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - एटीएममधून पैसे काढताना एटीएम मशिन अचानक बंद पडल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला पैसे मिळाले नाहीत. ही दहा हजार रुपयांची रक्कम मिळावी, म्हणून हा ज्येष्ठ नागरिक तीन महिन्यांपासून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खडकी शाखेचे उंबरे झिजवत आहे. मात्र, तांत्रिक कारणे सांगत बॅंक पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे ‘तुमचे पैसे द्यायला आम्ही काय बॅंक आहोत ?’ अशा शब्दांत खडकी पोलिस या ज्येष्ठाचा पाणउतारा करीत आहेत. 

जगदीश प्रसाद श्रीवास्तव (वय ६४, चिखलवाडी, खडकी) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. श्रीवास्तव हे १८ एप्रिलला सांगवीतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममधून दहा हजार रुपये काढण्याची प्रक्रिया त्यांनी केली. त्याच वेळी एटीएम मशिन बंद पडले.

श्रीवास्तव यांनी तत्काळ स्टेट बॅंकेच्या खडकी येथील शाखेत जाऊन यासंदर्भात तक्रार केली. बॅंक अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे वेळकाढूपणा केला. त्यांच्याच सल्ल्यानुसार ‘एसबीआय’च्या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार दिली. त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर श्रीवास्तव यांना संबंधित अधिकाऱ्यांनीच सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यास सांगितले. सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविल्यानंतर त्यांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासू, असे सांगून खडकी पोलिसांकडे पाठविले.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून पैसे गेल्याचे सांगत जबाबदारी झटकली. त्यानंतर श्रीवास्तव हे तक्रारीबाबत खडकी पोलिस ठाण्यात विचारणा करण्यास गेल्यानंतर ‘आम्ही तुमचे पैसे द्यायला बॅंक आहोत का?’ अशा शब्दांत त्यांच्या जखमेवर पोलिसांनी मीठ चोळले. श्रीवास्तव यांनी तीन महिने बॅंक, पोलिस ठाण्याचे उंबरे झिजविले, पण त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढताना ते मशिन बंद पडले. मी २५ वर्षे बॅंकेचा खातेदार असूनही त्यांनी माझ्याच कष्टाचे पैसे मला देण्यास टाळाटाळ केली आहे. पोलिसही दखल घेत नाहीत. माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाने अखेर न्याय तरी कोणाकडे मागायचा? 
- जगदीश श्रीवास्तव, पीडित ज्येष्ठ नागरिक

Web Title: #SeniorCitizen bank police complaint