#SeniorCitizen निवृत्तीनंतरच्या पैशांसाठी ज्येष्ठांची फसवणूक

#SeniorCitizen निवृत्तीनंतरच्या पैशांसाठी ज्येष्ठांची फसवणूक

पुणे - ‘‘पीएफच्या दिल्ली कार्यालयातून बोलत आहे. तुमचे रिटायर्डमेंटनंतरचे साडेतीन लाख रुपये आले आहेत. ते पाहिजे असतील, तर तुमच्या बॅंक खात्याची माहिती द्या. काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवा आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमच्या खात्यामध्ये ३० हजार रुपये तत्काळ भरा,’’ अशी बतावणी करीत काही चोरटे शहरातील केंद्रीय निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. याबाबत पोलिसांशीही काही कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला आहे.  

लष्कर, प्राप्तिकर, टेलिफोन, बॅंक, रेल्वे व आरोग्य अशा वेगवेगळ्या केंद्र सरकारी विभागांची कार्यालये पुण्यात आहेत. यामध्ये लाखो नागरिक नोकरी करतात. निवृत्तीनंतर बहुतांश अधिकारी व कर्मचारी पुण्यातच वास्तव्य करतात. या ज्येष्ठांची आता फसवणूक करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

चोरटे या पेन्शनर ज्येष्ठांशी संपर्क साधून विमा, भविष्यनिर्वाह निधी किंवा अन्य कारणे सांगून त्यांना ३ ते १० लाखांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचे सांगतात. रक्कम जादा असल्यामुळे प्रक्रिया शुल्क म्हणून काही रक्कम त्यांना भरायला सांगतात. पैसे खात्यात भरले गेले, की चोरट्यांचे फोन थांबतात, असाही अनुभव काही जणांना आला आहे. 

चोरटे निधन झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना लक्ष्य करीत आहेत. संबंधित कर्मचारी हयात असताना कोठे गुंतवणूक केली, कोठून पैसे मिळणार आहेत किंवा कोणाला पैसे दिले, याबाबत कुटुंबातील अन्य सदस्यांना फारसे काही सांगितले जात नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांची फसवणूक करण्याचाही प्रयत्न चोरटे करीत आहेत. 

‘‘माझे वडील चंद्रकांत कुंभार बीएसएनएलमधून निवृत्त झाल्यानंतर १० मार्च २०१८ ला त्यांचे निधन झाले. दरम्यान मागील आठवड्यात दिल्लीतून एक फोन आला. वडिलांच्या पीएफमधील १० टक्के रक्कम सरकारकडे जमा होत होती. ती रक्कम ३ लाख १० हजार इतकी झाली आहे. रक्कम मिळण्यासाठी बॅंक खात्याची माहिती व सर्व कागदपत्रे पाठवून द्या, असे सांगितले. मला संशय आल्याने मी इतरांकडे विचारपूस केली, त्या वेळी या पद्धतीने फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.’’ 
- मिलिंद कुंभार, नोकरदार.

‘‘माझ्याकडे २० ते ३० सेवानिवृत्तांनी त्यांना फोन आल्याचे सांगितले. काही लाखांचे आमिष दाखवून निवृत्त किंवा त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. दिल्लीस्थित कार्यालय असणाऱ्यांनाच असे फोन येतात. अशा फोनमुळे फसवणूक झाल्याचे उदाहरण नाही; मात्र हा धोका कायम आहे. फसवणूक टाळण्यासाठी निवृत्तांनी पोलिसांशी किंवा आमच्या संघटनेशी संपर्क साधावा.’’
- श्रीपाद देशपांडे, सहायक सरचिटणीस, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्न्मेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे विभाग

‘‘फसवणूक करणारे केंद्रीय निवृत्तांना लक्ष्य करत आहेत. त्याविषयी पोलिसांकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. अद्याप फसवणूक झालेली नसली, तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात दिल्ली पोलिस व संबंधित कार्यालयांशीही पोलिसांनी संपर्क साधला आहे.’’ 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com