एसटी स्थानकावर महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीची मागणी

ST
ST

बारामती : येथून राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने बारामती-पुणे-बारामती प्रवास करणाऱ्या महिलांचे दररोज कमालीचे हाल होतात. महिलांसाठी तिकीटांची स्वतंत्र रांग नसल्याने आणि अनेकदा महिलांच्या जागांवर पुरुषांचे होणारे आक्रमण या मुळे महिलांची कमालीची कुचंबणा होत आहे. महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी व महिलांच्या जागेवर महिलांनाच बसण्याचा हक्क या दोन गोष्टी मिळाव्यात अशी महिलांची मागणी आहे. 

बारामती-पुणे-बारामती विनावाहक विनाथांबा दररोज 44 गाड्या फेऱ्या करतात. सकाळी व संध्याकाळी बारामती व स्वारगेट या दोन्ही स्थानकांवर या गाडयांसाठी तिकीट काढण्यासाठी गर्दी असते. तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना किमान अर्धा तास रांगेत थांबावेच लागते. गाड्या व चालकांच्या अपुऱ्या संख्येचे गणित बारामती आगाराला जुळतच नसल्याने प्रवाशांचे दररोज कमालीचे हाल होतात. 

या प्रवासात निम्म्याहून अधिक महिला व युवती असतात. त्यांनाही या रांगेत थांबून धक्काबुक्कीत तिकीटे मिळविण्याशिवाय पर्यायच नसतो. अनेकदा त्यांना महिलांसाठी राखीव आसनांवरील तिकीटे मिळत नाहीत अनेकदा शेवटच्या बाकांवर तिकीट मिळाल्याने दाटीवाटीत अंग चोरुन अडीच तास बसण्याची शिक्षा अनेक महिला दररोज भोगतात. अनेकदा दोन पुरुषांच्या मधली सीट मिळण्याची शिक्षाही या महिलांना मिळते, त्या मुळे त्यांचे हाल होतात.

बारामती व स्वारगेट या दोन्ही बसस्थानकांवर महिलांसाठी तिकीटांची स्वतंत्र रांग करावी, महिलांशेजारी महिलांनाच तिकीट द्यावे, एक पुरुष व एक महिला असे तिकीट वाटप केल्यास महिलांचे दररोज होणारे हाल व त्यांची प्रवासातील कुचंबणा थांबेल, अशी मागणी सुनीता पाटील यांनी केली.

ही मागणी रास्त आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी बोलून काही सोय करणे शक्य आहे का याची चाचपणी केली जाईल, असे बारामतीचे आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांनी सांगितले. 

बारामतीहून पुण्याला जाताना जेजुरी व सासवडच्या मध्ये आणि पुण्याहून निघाल्यावर जेजुरीनजिक एक पाच मिनिटांचा थांबा महिलांच्या दृष्टीने गरजेचा असल्याचे महिलांचे मत आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय असलेल्या ठिकाणी हा थांबा दिल्यास महिलांची सोय होईल. अडीच तासांच्या प्रवासात महिलांचे अनेकदा हाल होतात, त्या मुळे एसटी प्रशासनाने याचाही विचार करावा अशी महिलांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com