#लग्नघटिका शुभमंगलपूर्वी ‘सावधान’ची भूमिका

सनील गाडेकर 
रविवार, 7 एप्रिल 2019

साखरपुडा आणि लग्न समारंभात काढलेली छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंग लग्नाच्या आठवणी ताज्या ठेवतात. या दोन्ही कार्यक्रमांवेळी केलेली धमाल त्यातून दांपत्याला आठवते. मात्र, आता हेच रेकॉर्ड लग्न मोडल्यास खर्च वसूल करण्यासाठी किंवा घटस्फोट घेताना पोटगीवेळी पुरावे म्हणून वापरण्यात येत आहे.

वैवाहिक जीवन जास्त काळ टिकण्याची शाश्‍वती कमी झाली आहे. त्यामुळे आजकालची तरुणाई लग्नाच्या वेळी अनेक प्रकारच्या खबरदारी घेत आहेत. साखरपुडा आणि लग्नाची छायाचित्रे व व्हिडिओ भविष्यातील अडचणीत पुरावा म्हणून जपून ठेवणे, लग्नापूर्वी स्वतःच्या नावावरील संपत्ती कुटुंबीयांच्या नावे करणे. लग्नाच्या वेळी एकमेकांची वैद्यकीय तपासणी करणे अशा बाबी केल्या जात आहेत. उच्चमध्यम वर्गातील कुटुंबे अशा प्रकारच्या भूमिका घेत आहेत. या सर्व प्रकारांवर प्रकाश टाकणारी ‘लग्नघटिका’ ही वृत्त मालिका.

पुणे -  साखरपुडा आणि लग्न समारंभात काढलेली छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंग लग्नाच्या आठवणी ताज्या ठेवतात. या दोन्ही कार्यक्रमांवेळी केलेली धमाल त्यातून दांपत्याला आठवते. मात्र, आता हेच रेकॉर्ड लग्न मोडल्यास खर्च वसूल करण्यासाठी किंवा घटस्फोट घेताना पोटगीवेळी पुरावे म्हणून वापरण्यात येत आहे.

साखरपुड्यासाठी किती खर्च केला? कोणत्या वस्तू दिल्या? लग्न कसे करायचे ठरले होते? या सर्व बाबींचे व्हिडिओ शूट करून ठेवले जात आहे, तर मानपानाची छायाचित्रे आणि वस्तूंची व इतर बाबींची बिलेदेखील जपून ठेवली जात आहेत. कारण काही कारणास्तव ठरलेले लग्न मोडल्यानंतर वधू किंवा वरपक्षाला साखरपुड्याचा खर्च मागायचा असेल, तर छायाचित्रे आणि व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून महत्त्वाचे ठरतात. व्हिडिओमध्ये तर तारीख आणि वेळही नमूद असते, त्यामुळे एकमेकांना दिलेली आश्‍वासने आणि खर्चाच्या सर्व बाबींचे चित्रीकरण करण्याचा अट्टहास असतो. 

आपण लग्न करीत असलेली व्यक्ती कशी आहे? त्याच्यावरील संस्कार कोणत्या पद्धतीचे आहेत? त्याची समजावून घेण्याची क्षमता किती आहे? या सर्व बाबी लग्न करण्यापूर्वी बऱ्याचदा एकमेकांना माहीत नसतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर काही वाद झाल्यास खर्च वसूल करण्यासाठी आपल्याकडे काही पुरावे असावेत, यासाठी पालकांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. ग्रामीण भागात अशा काही गोष्टी होत नाहीत. मात्र, शहरातील उच्च मध्यम वर्गातील पालक संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन करत आहेत.

गाडी घेताना जसा विमा काढतो, त्याच पद्धतीने आता लग्नाच्या वेळीच घटस्फोटाच्या परिस्थितीचा विचार केला जात आहे. शहरी भागात या सर्व बाबी प्रामुख्याने जाणवतात. घटस्फोटाच्या खटल्यात लग्नासाठी खर्च केलेल्या पावत्या, छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावा म्हणून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
- सुप्रिया कोठारी, वकील

Web Title: The series of wedding ceremonies The role of caution before wedding